बारामती मतदारसंघ जिंकण्याचे भाजपा चे स्वप्न स्वप्नच राहणार=महेश तपासे
मुंबई दि ६ सप्टेबंर | संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांचा बारामती लोकसभा मतदारसंघ काबीज करु आणि त्यांचा पराभव करु असे स्वप्न भाजपचे लोक बघत असून त्यांचे हे स्वप्न स्वप्नच राहणार, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ काबीज करु असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते, त्या वक्तव्याचा समाचार महेश तपासे यांनी घेतला.
बारामती लोकसभा मतदारसंघ हा राजकारणाने नाही तर समाजकारणाने बांधलेला आहे. खासदार सुप्रियाताई सुळे यांचा परिचय एक समाजकारणी म्हणून जास्त आहे. राजकारण करण्याची भूमिका भाजपची आहे. समाजकारणाचे बाळकडू खासदार सुप्रियाताई सुळे यांना लहानपणापासून स्व. यशवंतराव चव्हाण आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या प्रेरणेतून मिळाले आहे याची आठवणही महेश तपासे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना करुन दिली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे हे नव्यानेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले असल्याने त्यांना कार्यकर्त्यांसमोर बोलावं लागतं. तसेच मीडियासमोर बोललं तर बातमी होते परंतु संपूर्ण महाराष्ट्राला खासदार सुप्रियाताई सुळे यांचे काम कसे आहे याचा परिचय असल्याचे महेश तपासे म्हणाले.
खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या कामाची प्रशंसा करणारे अनेक भाजप खासदार आहेत. शिवाय सलग सातवेळा संसदरत्न, १६ व्या लोकसभेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी संसद महारत्न आणि १७ व्या लोकसभेतील कामगिरीसाठी संसद विशिष्ट रत्न या पुरस्काराने खासदार सुप्रियाताई सुळे यांचा सन्मान करण्यात आला आहे आणि तेही मोदी राजवटीत, अशी आठवणही महेश तपासे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना करुन दिली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम