महामार्गावर मध्यरात्री बस पलटी २६ प्रवासी ठार !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ जुलै २०२३ ।  राज्यातील समृद्धी महामार्गावर काल मध्यरात्री मोठा आणि भीषण अपघात झाल्याची बातमी आली आहे. हा अपघात बुलढाणा येथील एक खासगी बस डिव्हायडरला धडकून पलटी झाली. त्यामुळे बसमध्ये मोठा स्फोट होऊन आग लागली. या आगीत बसमधील 26 प्रवाशी होरपळून जागीच गतप्राण झाले. तर आठ जणांना आपले प्राण वाचवण्यात यश आलं आहे. मात्र, या आठही जणांना जबर मार लागला आहे. अपघातानंतर बस पेटल्याने बसचा जळून कोळसा झाला आहे. काल प्रवाशांनी खच्चून भरून निघालेल्या या बसचा आज केवळ सांगाडाच उरला आहे.

विदर्भ टॅव्हल्सची ही खासगी बस काल संध्याकाळी 5 वाजता नागपूरहून पुण्याकडे निघाली होती. या बसमध्ये दोन चालक होते. एका चालकाने कारंजापर्यंत ही बस चालवली होती. रात्री ही बस कारंजा येथे थांबली होती. यावेळी सर्व प्रवाशांनी कारंजा येथे थांबून जेवण केलं होतं. सर्व प्रवाशी जेवल्यानंतर ही बस पुण्याच्या दिशेने निघाली. जेवणानंतर काही प्रवासी झोपी गेले होते. काही प्रवासी गप्पा मारत होते. तर काही प्रवासी लहान लेकरांना झोपू घालत होते.

ही बस बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा गावाजवळ आली. समृद्धी महामार्गावरून ही बस जात होती. त्यावेळी रात्रीचे एक ते दीड वाजला होता. त्यामुळे सर्व प्रवासी गाढ झोपेत होते. ही बस पिंपळखुटा गावाजवळ येताच एका खांबाला धडकली. त्यामुळे चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे ही बस पुढे असलेल्या डिव्हायडरला धडकली. त्यामुळे बसच्या टँकची डिव्हायडरला धडक लागली आणि टँक फुटला. त्यामुळे स्फोटाचा आवाज झाला अन् अचानक आग लागली.
त्यानंतर तरीही बस डिव्हायडरला घासत पुढे गेली आणि पलटी झाली. त्यामुळे प्रवाशांना बसमधून बाहेर पडणं कठिण झालं. तर एक चालक आणि इतर सात प्रवाशांनी खिडकीच्या काचा फोडून बसमधून बाहेर पडत स्वत:चे जीव वाचवले. रात्रीची वेळ असल्याने त्यांना इतर प्रवाशांचे जीव वाचवता आले नाही.

आगीने बघात बघता रौद्ररूप धारण केलं. त्यामुळे बसमधील 26 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. या बसमधून एकूण 33 प्रवासी प्रवास करत होते. या बसचा एक चालक दगावला आहे. तर दुसरा चालक शेख दानिश शेख इस्माईल हा बचावला आहे. बस पूर्णपणे जळून खाक झाली असून बसचा केवळ सांगाडा उरला आहे. ही बस क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्याचं काम सुरू आहे.
दरम्यान, या अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. या भीषण अपघाताने आपण व्यथित झाल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. दुर्घटनेची माहिती कळताच तातडीने महामार्गासाठी तैनात आपत्कालीन वैद्यकीय सेवा पथक तसेच अग्निशमन दल त्याठिकाणी पोहचले आणि त्यांनी बचाव कार्य सुरु केले. जखमी प्रवाशांना काढून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्रकृती धोक्याबाहेर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही शोक व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भ ट्रॅव्हल्सच्या पुणे येथे जाणाऱ्या एका खासगी बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे अपघात होऊन 26 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत 8 जण जखमी झाले असून त्यांना सिंदखेडराजा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. जिल्हा तसेच पोलिस प्रशासनाशी आम्ही संपर्कात असून तातडीने सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिली जात आहे. पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही बस एका पुलावर आदळली आणि त्यानंतर डिझेल टाकी फुटल्याने वाहनाला आग लागली, असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम