सत्ताधारी खुर्ची सांभाळण्यात व्यस्त ; जळगावात आपच्या महिला प्रदेशाध्यक्षांचा आरोप !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ ऑगस्ट २०२३ ।  जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार करुन निघृण खून करण्यात आल्याची घटना घडली होती. समाज या घटनांनी विस्कळीत झालेला असताना राज्यकर्ते खुर्ची सांभाळण्यात व्यस्त असल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा सीमा गुट्टे यांनी केला. भडगाव येथील अत्याचारानंतर खून करण्यात आलेल्या मुलीच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी गुट्टे या जळगाव जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी जळगावात पत्रकार परिषद घेतली. आपचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील गाजरे, युवा महानगराध्यक्ष अमृता नेतकर, औरंगाबादच्या जिल्हाध्यक्षा ज्योती जाधव उपस्थित होत्या.

सीमा गुट्टे म्हणाल्या की, राज्यात अत्याचाराच्या घटनांनी समाज विस्कळीत झालेला असताना राजकारण्यांचे लक्ष नाही.भडगाव तालुक्यात 19 वर्षीय युवकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिचा निघृण खून केल्याची घटना महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी आहे. या घटना सातत्याने घडत असल्याने समाज चिंताक्रांत आहे. राज्यातील ट्रीपल इंजीन सरकारच्या काळात महिला व मुली सुरक्षित नाहीत. भाजप सरकारमध्ये महिला व मुलींना न्याय मिळत नाही. दिल्लीत महिला खेळाडूंनी आंदोलन केले.त्यांनाही सरकार न्याय देऊ शकले नाही. दर्शना पवार खून प्रकरण, पुण्यात कोयता घेऊन युवक युवतीच्या मागे धावतो, शहरांमध्ये महिला व मुली सुरक्षित नाहीत. आता खेडोपाडीही अत्याचाराच्या घटना घडू लागल्या आहेत. समाजापुढे अनेक प्रश्न आहेत. त्याकडे सरकार लक्ष देत नाही. दिल्लीत आम आदमी पार्टीचे सरकार आल्यानंतर गुन्हेगारीच्या घटना 70 टक्के कमी झाल्या आहेत. केजरीवाल सरकारने महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना केल्या आहेत. बसमध्ये महिलांना प्रवास मोफत आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. बाऊन्सर्स ठेवण्यात आले आहेत. अशा सुरक्षेच्या उपाय योजना महाराष्ट्रातही करण्यात याव्यात. भडगाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन खून प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याचीही मागणी त्यांनी केली. राज्यातील महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांबाबत सरकारने उपाय योजना न केल्यास मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही गुट्टे यांनी दिला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम