
वडिलांच्या परिस्थितीची जाणीव ठेवत सीए परीक्षेत मीनल बडगुजर ठरली खरी ‘यशवंत’ पोरीने शिक्षणाचे खरोखर चीज केले म्हणून आईवडिलांच्या डोळ्यातून तरळले आनंदाश्रू
खानदेशातील बडगुजर समाजातील मुलींमध्ये पहिल्या सीए होण्याचा मिळवला बहुमान
*अमळनेर* (प्रतिनिधी) वडिलांच्या गरिबीच्या परिस्थितीची जाणीव ठेवून अमळनेर येथील मीनल यशवंत बडगुजर हिने सीए ( चार्टर्ड अकाऊंट) परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवले आहे. तिचा निकाल जाहीर होताच पोरीने शिक्षणाचे चीज केले म्हणून आईवडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. तर बडगुजर समाजात खानदेशातून सीए होणारी ती पहिली मुलगी ठरली. तिने मिळवलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अमळनेर येथील यशवंत बडगुजर यांचे छोटेसे किराणा दुकान आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यांची आर्थिक परिस्थिती गरिबीची असतानाही मुलगी मीनल हिला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.
अनेकांनी मुलीला एवढे शिकवून काय करणार असा फुकटचा सल्ला ही दिला. परंतु मुलगी मीनल आधीपासूनच अभ्यासात हुशार असल्याने तिने निवडलेल्या सीएच्या करिअरसाठी ते तिच्या पाठीशी उभे राहिले.
मीनल हिलाही आईवडिलांच्या परिस्थितीची आणि त्यांच्या कष्टाची जाणीव होती. म्हणूनच तिने ही जिद्द, चिकाटी, आणि मेहनतीने अभ्यास करून सीएची परीक्षा दिली. यात केलेल्या परिश्रमाचे फलित म्हणून तिने दैदिप्यमान यश मिळवले. मुलगी सीए झाल्याने यशवंत रामदास बडगुजर यांच्या कुटुंबाचे नाव मीनलने उंचावले आहे. आईवडिलांनी शिक्षणासाठी दिलेल्या प्रोत्साहानामुळेच यश मिळवता आले, असे मीनल हिने सांगितले. विशेष म्हणजे
जळगांव, धुळे नंदुरबार या तीन जिल्ह्यातून बडगुजर समाजातील सीए होणारी ती पहिलीच मुलगी ठरली आहे. त्यामुळे तिच्या या दैदीप्यमान यशाचे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, स्वप्ना विक्रांत पाटील, माजी नगरसेवक विक्रांत भास्करराव पाटील, गिरीश बडगुजर, यांच्यासह नातेवाईक, कुटूंबीय आणि प्रतिष्ठीतांकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम