अधिसूचना जारी झालेल्या मंडळांत मिळणार भरपाई : कृषिमंत्री मुंडे !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १८ ऑक्टोबर २०२३

२१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड असलेल्या मंडळांची संख्या व जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना जारी केलेल्या मंडळांची संख्या यात तफावत असली तरी कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर तेथेही पाऊस नसल्याचे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध केले आहे. त्यानंतर या पंचनाम्यांवर ज्या विमा कंपन्यांनी आक्षेप घेतला होता, त्यांनीही ते मान्य केले आहे. त्यामुळे सर्व अधिसूचित मंडळांमध्ये पीक विमा योजनेतील नुकसानभरपाईच्या २५ टक्के अग्रीम रक्कम दिवाळीपूर्वी देण्यात येईल, असे आश्वासन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. तसेच, विमा भरपाई लुटणाऱ्यांवर पोलीस कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्याचा रब्बी हंगामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कृषी विभागाने जाहीर केलेल्या मंडळांपेक्षा जास्त मंडळांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना जारी केली. त्यावर विमा कंपन्यांनी आक्षेप घेतले. पर्जन्यमापकाच्या परिसरात झालेल्या पावसामुळे त्या ठिकाणी खंड दिसून येत नाही. मात्र परिसरातील अन्य २५ गावांमध्ये पाऊस नव्हता. कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून त्या गावांमधील पिकांची व पावसाची स्थिती शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध करण्यात आली. त्यामुळे निकषांमधील दुसऱ्या घटकाच्या आधारे आता या पंचनाम्यांवर कंपन्यांनी घेतलेले आक्षेप रद्द केले आहेत. त्यामुळे अधिसूचना जारी झालेल्या सर्व मंडळांमधील शेतकऱ्यांना पीक विमा निकषांनुसार नुकसानभरपाईच्या २५ टक्के अग्रीम रक्कम देण्याचे आदेश विमा कंपन्यांना देण्यात आले आहेत. दिवाळीपूर्वी ही अग्रीम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले. विमा देताना कंपन्यांना आक्षेप घेण्याच्या अधिकार आहे. मात्र त्यानंतर विभागीय स्तरावर आलेल्या आक्षेपांना फेटाळण्यात आले आहे. काही कंपन्यांनी आता राज्यस्तरावर अर्थात कृषी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे आक्षेप नोंदवले आहेत. ते फेटाळल्यानंतर शेतकऱ्यांना अग्रीम देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या नावाखाली भरपाईची रक्कम लुटणाऱ्या गैरप्रकारांबाबत विचारले असता ते म्हणाले, विम्याची नोंद सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच असे प्रकार लक्षात आले. या प्रकारांची नोंद कागदोपत्री घेण्यात येत आहे. याची पूर्ण माहिती हाती आल्यानंतर शेतकरी दाखवून, इतरांच्या जमिनी दाखवून रक्कम लुटण्याचे प्रकार करणाऱ्यांवर निश्चित कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पर्जन्यमापकात पाणी ओतून अवकाळी पाऊस झाल्याचे प्रकारही वाशिम जिल्ह्यात घडले आहेत. याबाबत मुंडे यांनी पोलीस कारवाईचा गंभीर इशारा दिला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम