पप्पा हट्टी आहेत जीवाचे काही झाले तर सरकार जबाबदार !
बातमीदार | ६ सप्टेंबर २०२३ | राज्यातील जालन्याच्या आंतरवाली सराटीत गत 9 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. जरांगे यांनी आरक्षणाचा वटहुकूम येईपर्यंत उपोषण न सोडण्याचा इशारा दिला आहे. त्यातच आता त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे मनोधैर्य वाढवत त्यांना आरक्षणाची मागणी पूर्ण होईपर्यंत मागे न हटण्याचे आवाहन केले आहे.
मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती काहीशी खालावली आहे. त्यामुळे त्यांना सध्या सलाईन लावण्यात आली आहे. आता जरांगे पाटील यांच्या निर्धाराला त्यांच्या कन्येनेही बळ दिले आहे. जरांगे यांच्या मुलीने आपल्या वडिलांना आरक्षण मिळाल्याशिवाय मागे न हटण्याचे आवाहन केले आहे. माझे पप्पा हट्टी आहेत. ते असेच उठणार नाहीत. त्यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले, तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल. माझीही भविष्यात आयपीएस होण्याची इच्छा आहे, असे जरांगे पाटील यांच्या मुलीने म्हटले आहे.
जरांगेंची कन्या पुढे म्हणाली की, लाठीचार्ज झाला त्यात पोलिसांचा दोष नाही. त्यांनी वरून आदेश मिळाल्यामुळे लाठीचार्ज केला असेल. पप्पांची काळजी वाटते, पण समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे. त्यामुळे त्यांनी आरक्षण मिळाल्याशिवाय उपोषण सोडू नये. वडिलांना हे आवाहन करताना तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. मनोज जरांगे यांच्या पत्नीनेही जरांगे यांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली आहे. तसेच सरकारलाही हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे आवाहन केले आहे.
दुसरीकडे, अहमदनगरच्या कोपर्डी येथील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांनीही मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. 4 दिवसांत मराठवाड्यासह संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास कोपर्डी येथे निर्भयाच्या समाधीपुढे उपोषण करण्याचा इशारा त्यांनी या प्रकरणी दिला आहे. तब्बल 7 वर्षानीही माझ्या मुलीला न्याय मिळाला नाही. आम्हाला कोणतीही माहिती दिली नाही. जिल्हा कोर्टात निकाल लागल्यानंतर आम्हाला कोणतीच माहिती मिळाली नाही, असे त्यांनी म्हटले आहे. कोपर्डीतील पीडित कुटुंब आज दिवसभर आत्मक्लेश आंदोलन करणार आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम