ठरलं : उद्याच होणार सत्तासंघर्षाचा निकाल !
दै. बातमीदार । १० मे २०२३ । राज्यात गेल्या काही महिन्यापासून सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या निकाल उद्या ११ मे रोजी सुप्रीम कोर्टानं राखून ठेवलेला असल्याने तो जाहीर होणार आहे, सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाकडून निर्णय जाहीर केला जाणार आहे. यामुळं आता राज्यात पुन्हा मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, “उद्या घटनापीठाकडून दोन प्रकरणांवर निकाल दिला जाणार आहे” यामध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल तसेच दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील खटल्यावरही अंतिम निकाल दिला जाणार आहे. दिल्लीच्या राज्यपालांकडून वारंवार प्रशासकीय कामात हस्तक्षेप केला जात असल्याचं हे प्रकरण आहे, असं ‘लाईव्ह लॉ’ नं म्हटलं आहे.
#BREAKING Supreme Court Constitution Bench to deliver the judgment in ShivSena case tomorrow, says CJI DY Chandrachud.
“We have two Constitution Bench judgments to deliver tomorrow”, says CJI DY Chandrachud. #SupremeCourtofIndia pic.twitter.com/7wTJyinVAC
— Live Law (@LiveLawIndia) May 10, 2023
अकरा महिन्यांपूर्वी अर्थात जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आपल्या ४० सहकारी आमदारांसह बंड केल्यानं राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला होता. अनेक दिवस सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडींमुळं अखेर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात नवं सरकार स्थापन केलं. या सरकारचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. दरम्यान, शिवसेनेचा व्हिप न पाळल्याप्रकरणी तत्कालीन पीठासीन अधिकारी नरहरी झिरवाळ यांनी शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली होती. यानंतर हा विषय सुप्रीम कोर्टात पोहोचला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम