अपात्रतेप्रकरणी राहुल नार्वेकर दिल्लीसाठी रवाना !
बातमीदार | २९ ऑक्तोबर २०२३
गेल्या दीड वर्षापासून शिंदे गटाच्या आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे वेळकाढूपणा करत आहेत, असा आरोप करत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उद्या 30 ऑक्टोबरला याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यापार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीसाठी रवाना झाले आहेत.
राहुल नार्वेकर दिल्लीत महाधिवक्ता तुषार मेहता यांची भेट घेणार आहेत. आमदार अपात्रताप्रकरणी 30 ऑक्टोबरपर्यंत नवे वेळापत्रक सादर करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने वेळापत्रकात नेमके काय बदल करायचे, यावर कायदेशीर सल्ला घेण्यासाठी राहुल नार्वेकरांनी दिल्लीत धाव घेतली आहे. दरम्यान, दिल्लीला रवाना होण्यापूर्वी मुंबई विमानतळावर राहुल नार्वेकरांनी पत्रकारांशी संवाद साधला. राहुल नार्वेकर म्हणाले, आमदार अपात्रतेबाबत दिल्लीत महाधिवक्ता तुषार मेहता यांची भेट घेणार आहे. हा माझा पूर्व नियोजित दौरा आहे. आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी वेळापत्रक बदलाबाबत जो कायदेशीर सल्ला घ्यायचा आहे, तो मी घेईन आणि लवकरच निर्णय देईन. राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनाही नोटीस पाठवली आहे. ही अपात्रतेबाबतची प्रक्रिया आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम