सरकारी नोकर उजेडात तर पोलीस दलाची दिवाळी अंधारात
दै. बातमीदार । १७ ऑक्टोबर २०२२ । राज्यात दिवाळी सन येत्या आठवड्यात येवून ठेपला असून आतापर्यत सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी सरकारच्या बोनसमुळे आनंदात जात असली तरी त्याला पोलीस विभाग अपवाद आहे. कोरोना काळात जीव धोक्यात घालून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणाऱ्या राज्यातील पोलिसांमध्ये पोलीस बोनस तसेच अॅडव्हान्स न दिल्यामुळे नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.
प्रवासी आणि गणवेश भत्ताही मिळालेला नाही. मागच्या दिवाळीमध्ये केवळ सातशे पन्नास रुपयांची कुपन देऊन तोंडाला पाने पुसली होती. त्यामुळे यंदाची दिवाळी तर गोड होईल अशी आशा वाटत होती मात्र, दिवाळी तोंडावर येऊनही अॅडव्हान्स पगार नाही. कोरोनाकाळी पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना भरघोस बोनस देण्यात आला होता. तेव्हाही पोलिसांची दमछाक झाली मात्र पोलिसांनी काही मिळाले नव्हते. मुंबईत २४तास काम करणाऱ्या पोलिसांची अशी हेटाळणी का करतायत अशी विचारणा पोलिस दलाकडून करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी, धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत आर.आर. चव्हाण या पोलीस निरीक्षकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून पोलिसांना एक महिन्याचे वेतन दिवाळी बोनस म्हणून देण्याची मागणी केली आहे. हे पत्र मुख्यमंत्री कार्यालय, गृहमंत्री कार्यालय, अर्थमंत्री कार्यालय आणि राज्याचे पोलीस महासंचालक कार्यालय अशा विविध कार्यालयांना पाठवण्यात आले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम