दिवाळी खरेदी करा पण बँक पाच दिवस बंद
दै. बातमीदार । २२ ऑक्टोबर २०२२ । दिवाळीची मोठ्या धामधूममध्ये सुरु आहे तर दुसरीकडे २२ पासून बँकांना सलग पाच दिवस सुटी आहे. पण या धामधुमीत काही राष्ट्रीयकृत बँकांसह त्यांचे एटीएम केंद्रही बंद असल्याने पहिल्याच दिवशी नागरिकांची मोठीच गैरसोय झाली. दिवाळी असल्याने शनिवारपासून सलग पाच दिवस राष्ट्रीयकृत बँकांना सुट्टी आहे. त्यामुळे आर्थिक कामकाज बंद पडणार असल्यामुळे नागरिकांना आजपासूनच पैशासाठी कुलूप बंद बँकाचे दर्शन घडले.
नाशिक रोडला प्रेस कामगारांसह अनेक केंद्रीय व राज्य सरकारी बँकांच्या पेन्शनरांचे खाते असलेल्या कॅनरा बँकेच्या बिटको चौकातील शाखेसह तेथील एटीएम केंद्रही बंद होते. परिणामी दिवसभर अनेक पेन्शनरांची परवड झाली. शहर जिल्ह्यात दिवसाला साधारण दीडशे ते दोनशे कोटीच्या आसपास आर्थिक उलाढाल होत असते. बँकांचे बरेच कामकाज ऑनलाइन झाले असले तरी दिवाळीसारख्या सण उत्सवात नागरिकांना हातखर्च, किरकोळ व्यवहारासाठी रोख रकमेची गरज असते.
दिवाळीला अनेकांचा घरगुती लक्ष्मी पूजेसाठी कोऱ्या नोटांचा आग्रह असतो. त्यामुळे चार- पाच दिवस आधीपासून बाजारात बँकेत कोऱ्या करकरीत नोटांच्या बंडलांची मागणी वाढते. सुटीत दिवाळी खरेदीचे नियोजन असलेल्या नागरिकांना किरकोळ खरेदीसाठी दिवाळी पूजा साहित्यासह दैनंदिन कामकाजाला रोख रकमेची गरज असते. मात्र, शनिवारी पहिल्या दिवशी काही बँकांच्या एटीएममध्ये खडखडाट झाल्याने तारांबळ उडाली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम