राज्यभरात आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीला सुरुवात !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ एप्रिल २०२३ ।  भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न, बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीचा उत्साह संपूर्ण देशासह राज्यभरात दिसून येत आहे. मध्यरात्री १२ वाजेपासून फटाक्यांच्या आतषबाजीने जयंतीला सुरुवात झाली. आज सकाळपासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील चैत्यभूमी आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवर भीमसागर उसळला आहे.

राज्यात विविध ठिकाणच्या बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत आज सायंकाळी मिरवणुका निघणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मूर्म आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशवासियांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला चैत्यभूमीवर जाऊन डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले.
आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेने चैत्यभूमी परिसरात बाबासाहेबांच्या जवळपास 100 दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शन भरवले आहे. सोलापूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखे अभिवादन करण्यात आले. स्पर्शरंग कला परिवाराच्या सदस्यांनी एक सेमी आकाराच्या 10 हजार 132 फोटोपासून बाबासाहेबांची प्रतिमा साकारण्यात आली. मनमाडमध्ये रात्री 12 वाजता भीम अनुयायांनी ढोल ताशांच्या गजरात मध्यवर्ती भागात असलेल्या डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी रांगा लावल्या होत्या.

भंडाऱ्यातील जवाहरनगर याठिकाणी मध्यरात्री 132 केक कापून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. नाशिकच्या नांदगावातील ममता रवींद्र आहेर या विद्यार्थिनीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने बाबासाहेबांची आकर्षक अशी रांगोळी काढत आपल्या कलेद्वारे त्यांना अनोखे अभिवादन केले आहे. बुलढाणा, छत्रपती संभीजीनगर येथे मध्यरात्री 12 वाजता फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम