छत्रपती संभाजीनगरात २५० कोटींचे अमली पदार्थ जप्त

बातमी शेअर करा...

बातमीदार | २३ ऑक्टोबर २०२३

छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात पुणे, अहमदाबाद येथील महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने संयुक्त कारवाई करत तब्बल २३ किलो कोकेनसह ७.४ किलो मेफेड्रोनचा साठा जप्त केला. या कारवाईत पथकाने जितेश कुमार हिनोरिया प्रेमजीभाई पटेल (४५, रा. गोलवाडी) आणि संदीप शंकर कुमावत (४०, रा. वाळंज) या दोघा आरोपींना अटक केली. पथकाने पैठण लिंक रोडवरील कांचनवाडी येथील फ्लोरेन्झा व्हिलाज येथे जितेश कुमार याच्या निवासस्थानी धाड टाकून तपासणी केली असता, त्याच्या घरातून तब्बल २३ किलो कोकेनचा साठा मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत १५० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. तसेच पथकाने ३० लाखांची रोकड व इतर साहित्य असा २५० कोटींचा साठा जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पुण्यात ललित पाटील याच्यावर ड्रग्जची कारवाई करण्यात आल्यानंतर देशभरात विविध ठिकाणी कोकेन, मेफेड्रोन यासह विविध अमली पदार्थांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. गुजरात येथील जीएसटीच्या डीआरआय पथकाला गुजरात येथून छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आणण्यात येत असल्याची माहिती हाती लागली होती. त्यामुळे त्या पथकाने पुण्यातील पथकाला सोबत घेऊन छत्रपती संभाजीनगर येथील पैठण रोडवरील पैठण लिंकरोडवर असलेल्या फ्लोरेन्झा व्हिला सोसायटीत १९ क्रमांकाच्या बंगल्यात शनिवारी (दि. २१) छापा टाकला. जितेश कुमार हिनोरिया प्रेमजीभाई पटेल यास ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून २३ किलो कोकेन जप्त केले. तसेच पैठण एमआयडीसीमधील

महालक्ष्मी इंडस्ट्रीज नावाचा कारखाना हा मेफेड्रोन आणि केटामाईनच्या उत्पादनात गुंतलेला असल्याच्या माहितीवरून या ठिकाणी पथकाने तपासणी केली असता, ४.५ किलो मेफेड्रोन, ४.३ किलो केटामाईन आणि सुमारे ९.३ किलो वजनाचे मेफेड्रोनचे आणखी एक मिश्रण जप्त केले. रोख ३० लाख रुपये जितेश पटेलच्या घरातून जप्त करण्यात आले. या अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थाचे बेकायदेशीर बाजार मूल्य हे २५० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. जप्त केलेले हे सर्व पदार्थ एनडीपीएस कायदा १९८५ च्या संबंधित तरतुदीनुसार जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत मुख्य सूत्रधारासह दोन जणांना एनडीपीएस कायद्यांच्या तरतुदीनुसार अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. या कारवाईत पथकाने जितेश कुमार हिनोरिया प्रेमजीभाई आणि संदीप शंकर कुमावत या दोघा आरोपींना अटक केली आहे. डीआरआयचे उपसंचालक राहुल निगवेकर यांच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम