तीन देशासह भारतातील काही भागात भूकंपाचे धक्के
बातमीदार | २३ ऑक्टोबर २०२३
जगभरातील तीन देशासह भारतातदेखील मागील १२ तासांत भूकंपाचे धक्के बसले आहे. म्यानमार, नेपाळसह भारतातील जम्मू-काश्मीरच्या काही भागात हादरे जाणवले. सोमवारी सकाळी सहा वाजता म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ४.३ इतकी नोंदवली. भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारमध्ये पृष्ठभागाखाली ९० किलोमीटरवर होता. मिझोराममध्ये रविवार-सोमवारच्या मध्यरात्री २ वाजून ०९ मिनिटांनी झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.५ नोंदवण्यात आली. मिझोरामच्या राजधानीत भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
रविवारी रात्री उशिरा जम्मू-काश्मीरच्या काही भागांत भूकंपाचे धक्के जाणवले. किश्तवाड जिल्ह्यात हादरे बसले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.५ इतकी नोंदली गेली, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून देण्यात आली. नेपाळमध्ये रविवारी सकाळी ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या शक्तिशाली भूकंपाने राजधानी काठमांडू हादरली. तीव्र धक्क्यांनी जवळपास २० घरांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
भूकंप आणि त्यानंतरच्या तीव्र धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली होती. रविवारी सकाळी ७.३९ मिनिटांनी भूकंप झाल्याची नोंद आहे. धाडिंग जिल्ह्यात केंद्रबिंदू होता. या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाली नाही. भूकंपाचे धक्के बागमती आणि गंडकी प्रांतातील अन्य जिल्ह्यांतही जाणवले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अनेक जिल्ह्यांत भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. काठमांडूपासून ९० किलोमीटरवर पश्चिमेकडील धाडिंग जिल्ह्यात २० घरांचे नुकसान झाले. तर, अन्य ७५ घरांच्या भितींना तडे गेले आहेत. सकाळी भूकंपानंतर दुपारीही धाडिंगमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता चारपेक्षा अधिक नोंदवली गेली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम