वीजवापराच्या प्रत्येक युनिटचे बिलिंग झालेच पाहिजे; मीटर रीडिंगमध्ये हयगय झाल्यास कारवाई निश्चित

महावितरणचे संचालक संजय ताकसांडे यांचा इशारा; महावितरणकडून नाशिक, जळगावमधील तीन मीटर रीडिंग एजन्सीज बडतर्फ तर तीन अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार। ०९ जुलै २०२२ । वीजग्राहकांना उत्कृष्ट व दर्जेदार सेवा तसेच महसूल वाढीसह सक्षमतेचा, प्रगतीचा वेग वाढविण्यासाठी महावितरणकडून आमुलाग्र सुधारणा सुरू आहेत. प्रत्यक्ष वीजवापराप्रमाणे ग्राहकांना अचूक बिल देणे ही महावितरणची जबाबदारी आहे. मीटर रीडिंग अचूक नसल्यास ग्राहकांना वीजबिल दुरुस्तीचा नाहक त्रास सहन करावा लागतो. सोबतच महावितरणच्या महसुलाचेही नुकसान होते. हे प्रकार टाळण्याची प्राथमिक जबाबदारी मीटर रीडिंग एजन्सीजची आहे. वारंवार सूचना देऊनही रीडिंग एजन्सीजच्या कामात सुधारणा होत नसेल तर मात्र कारवाई अटळ आहे. तसेच महावितरणच्या जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी शुक्रवारी (दि. ८) दिला.

नाशिक व जळगाव परिमंडलातील मीटर रीडिंग एजन्सीजचे संचालक व व्यवस्थापकांच्या नाशिक येथे झालेल्या बैठकीत संचालक ताकसांडे बोलत होते. गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार सूचना देऊनही अचूक मीटर रीडिंगसाठी सुधारणा न करणाऱ्या तीन मीटर रीडिंग एजन्सीजना या बैठकीतच तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले तर संबंधित जबाबदार तीन कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या आढावा बैठकीत संचालक संजय ताकसांडे यांनी मीटर रीडिंग एजन्सीजच्या संचालकांना अचूक बिलींगमधील त्यांची भूमिका व जबाबदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

संचालक (संचालन) संजय ताकसांडे म्हणाले की, मीटर रीडिंग हा बिलींगचा मुख्य आधार आहे. त्यात १०० टक्के अचूकता पाहिजेच. परंतु चुकीचे किंवा सदोष रीडिंग घेतल्यास महावितरणच्या महसुलाचे नुकसान आणि ग्राहकांना वीजबिल दुरुस्तीचा नाहक त्रास होतो ही बाब अजिबात खपवून घेतली जाणार नाही. मीटर रीडिंग एजन्सीजवर केवळ कारवाई करणे हा मुख्य उद्देश नाही. परंतु रीडिंगसाठी जे अचूकतेचे, गुणवत्तेचे मापदंड आहेत त्यात कुचराई झाल्यास एजन्सीज व महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. अचूक मीटर रीडिंगबाबत उपविभाग व विभाग कार्यालयांनी दैनंदिन आढावा घ्यावा. दैनंदिन पर्यवेक्षण करावे. बिलिंग किंवा रीडिंगमध्ये कोणतीही अनियमितता आढळल्यास ताबडतोब उपाय करावेत व ग्राहकांना अचूक बिल देण्यात येईल याची काळजी घ्यावी. सोबतच मीटर रीडर नियुक्त करताना त्यांची शैक्षणिक पात्रता, तांत्रिक प्रशिक्षण, संवाद कौशल्य, गुणवत्ता इत्यादी बाबी संबंधित अधिकाऱ्यांनी एजन्सीजकडून तपासून घ्याव्यात असे निर्देश यावेळी संचालक ताकसांडे यांनी दिले.

या बैठकीमध्ये सादरीकरणाद्वारे एजन्सीकडून होणाऱ्या फोटो मीटर रीडिंगमधील चुका, सदोष रीडिंग, मीटर नादुरुस्त असल्याबाबत चुकीचा शेरा आदींची माहिती देण्यात आली व त्यामध्ये सुधारणा करण्याबाबत विविध उपाय सांगण्यात आले. १०० टक्के अचूक मीटर रीडिंगसाठी ठरवून देण्यात उपाययोजनांची सातत्याने अंमलबजावणी करण्यात यावी. अचूक मीटर रीडिंगबाबत उपविभाग व विभाग कार्यालयांनी दैनंदिन आढावा घ्यावा. बिलिंगचे पर्यवेक्षण करावे. त्यातील अनियमितता टाळून वीजग्राहकांना योग्य व अचूक बिल देण्यात येईल याची सदोदित काळजी घ्यावी असे निर्देश संचालक ताकसांडे यांनी यावेळी दिले.

या बैठकीमध्ये कार्यकारी संचालक (देयके व महसूल) योगेश गडकरी, मुख्य अभियंता सर्वश्री संजय पाटील (देयके व महसूल), दीपक कुमठेकर (नाशिक परिमंडल) व कैलास हुमणे (जळगाव परिमंडल) तसेच सर्व अधीक्षक अभियंते व मीटर रीडिंग एजन्सीजचे संचालक उपस्थित होते. सोबतच नाशिक व जळगाव परिमंडलातील सर्व कार्यकारी अभियंते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला उपस्थित होते.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम