राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ ; २० पदव्या निघाल्या बोगस !
बातमीदार | १० ऑगस्ट २०२३ | राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजविणारी बातमी समोर आली आहे. राज्यातील २० विद्यार्थ्यांनी बीएस्सी एमएलडी, डीएमएलटी या बनावट पदव्या घेतल्याची बाब उघडकीस आली असून यात पॅरावैद्यक परिषदेने त्यांच्याकडे आलेली कागदपत्रे नाशिकमधील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडे पडताळणीसाठी पाठविली होती.
पडताळणीअंती ती कागदपत्रे बनावट असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी मुक्त विद्यापीठातर्फे नाशिक तालुका पोलिसांत बनावट कागदपत्रे व पदवी देणाऱ्या राज्यातील चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. गौरव अनिलकुमार शिरसकर (रा. साईरचना अपार्टमेंट, खायरी, नागपूर), रमेश होनमोरे (रा. कराड, जि. सातारा), अशोक ज्ञानदेव सोनवणे (रा. रुद्र एज्युकेशन सोसायटी, दिल्ली गेट, अहमदनगर), संजय गोविंद नायर (रा. महानंदानगर, मनमाड, ता. नांदगाव, जि. नाशिक) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा कक्षाचे उपकुलसचिव मनोज घंटे (रा. नाशिक) यांनी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यानुसार गेल्या २०२० मध्ये राज्यातील २० जणांनी पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्याकरिता परवानगीसाठी महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषदेकडे अर्ज केले होते. याबाबतच्या पदवी व पदविका गुणपत्रकांसह कागदपत्रांची पडताळणीसाठी पॅरावैद्यक परिषदेने मुक्त विद्यापीठाकडे पाठपुरावा केला होता. विद्यापीठाच्या पडताळणीमध्ये संबंधित विद्यार्थ्यांची नोंदणीच झाली नसल्याची बाब उघडकीस आली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम