पवारांची फाईल शिंदेंसह फडणवीस तपासणार ; नाराजी कायम !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ जुलै २०२३ । राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेल्या आमदारांच्या तीव्र नाराजी नंतर देखील राज्याचे अर्थमंत्री पद हे अजित पवार यांना मिळाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे गटाची नाराजी तीव्र असून याची चर्चा देखील सुरु आहे. दरम्यान आता अजित पवार शिंदे गटाला निधी देणार का? याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

अर्थ खातं अजित पवारांकडे असलं तरी देखील मविआ सरकार सारखी पुनरावृत्ती होणार नाही. अर्थ खात्याकडे येणारी प्रत्येक फाईल ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेखालून जाणार आहेत. त्यामुळे मविआच्या काळात जे असंतुलित काम झालं होतं, त्यामुळे मागच्या काळात जे गैरसमज झाले होते. ते या काळात होणार नाही. हा निर्णय योग्य असल्याचं सांगत अजित पवारांकडे अर्थ खाते देण्यात आल्याचं समर्थनही गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. अजित पवार यांच्या फायली फक्त मुख्यमंत्री नव्हे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही नजरेखालून जाणार असल्याचं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं आहे. म्हणजे अजित पवार यांनी मंजूर केलेली फाईल शिंदे फडणवीस यांच्या नजरेखालून जाणार असल्याचं स्पष्ट होत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांना प्रशासनाचा फारसा अनुभव नव्हता त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थ खाते आणि उपमुख्यमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे असल्याने निधी मिळण्याबाबत आमदारांना अडचणी येत होत्या. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याने शिवसेनेला वाटा सारखाच मिळेल. त्यात कुठल्याही प्रकारची गडबड होणार नाही याची खात्री आम्हाला आहे, असंही गुलाबराव पाटील म्हणालेत. अर्थ खाते अजित पवारांकडे असलं तरी आपण मुख्यमंत्री असल्याने आमदारांना काहीच अडचणी येणार नाहीत, असंही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम