
शेतकऱयांची चिंता वाढणार ; ४ जूनला केरळात मान्सून होणार दाखल !
दै. बातमीदार । १७ मे २०२३ । देशातील बदलत्या हवामानाबाबत शेतकऱयांसह सर्वांनाच चिंताजनक बातमी समोर आली आहे. मान्सूनच्या आगमनाबाबत हवामान खात्याने दिली आहे. यंदा मान्सूनचा लेटमार्क लागणार आहे. केरळात चार दिवस उशिराने म्हणजेच 4 जूनला मान्सून धडकेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) मंगळवारी वर्तवला. त्यामुळे मुंबईतही मान्सूनच्या हजेरीचा मुहूर्त लांबणीवर पडणार आहे.
हवामान खात्याने याआधी गेल्या महिन्यात भाकीत वर्तवले होते. त्यावेळी संपूर्ण देशभर यंदाच्या हंगामात वरुणराजा समाधानकारक हजेरी लावेल, असा अंदाज वर्तवला होता. त्यानंतर उकाडय़ाची तीव्रता वाढली आणि सर्वांना मान्सूनच्या आगमनाची ओढ लागली आहे. याचदरम्यान, आयएमडीने मंगळवारी मान्सूनच्या लेटमार्कचे भाकीत केले. सर्वसाधारणपणे मान्सून केरळमध्ये 1 जूनला हजेरी लावतो. यंदा हा मुहूर्त टळण्याची दाट शक्यता असून 4 जूनला मान्सून केरळात धडक देईल, असे आयएमडीने म्हटले आहे. प्रामुख्याने केरळातील हजेरीवर मान्सूनचा देशातील पुढचा प्रवास अवलंबून असतो. मान्सून येथेच उशिराने हजेरी लावणार असल्याने शेतकऱयांची चिंता वाढली आहे. हवामान खात्याच्या याआधीच्या अंदाजानुसार, यंदा सरासरी 96 टक्के पाऊस पडणार आहे, तर स्कायमेटने सरासरी 94 टक्के पावसाचे भाकीत केले आहे. मात्र पावसाचा मुहूर्त लांबल्यास त्याचा खरीप पिकांवर परिणाम होऊन मोठे नुकसान होण्याची भीती आहे. हवामान खाते मे महिन्याच्या अखेरीस पुन्हा सुधारित भाकीत करणार आहे. मान्सून पुढच्या वाटचालीत कितपत सक्रिय होतोय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केरळातील मान्सूनची एंट्री
2022 29 मे
2021 3 जून
2020 1 जून
उकाडा जूनपर्यंत कायम राहणार, स्कायमेटचा अंदाज
हवामान खात्यासह ‘स्कायमेट’ या खासगी संस्थेनेही मान्सूनच्या लेटमार्कचे भाकीत केले आहे. मान्सून उशिराने केरळात येईल तसेच सुरुवातीला तो कमी तीव्रतेचा असेल. तसेच जूनपर्यंत उकाडा कायम राहील, असा अंदाज ‘स्कायमेट’चे संस्थापक-संचालक जतिन सिंग यांनी मंगळवारी ट्विटच्या माध्यमातून वर्तवला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम