बातमीदार | २१ ऑगस्ट २०२३ | देशातील कॉंग्रेस पक्षातील नेत्यावर हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. देशातील छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या महिला आमदार छन्नी साहू यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली असून आरोपीने नशेच्या धुंदीत साहू यांना चाकूने भोसकले. राजनांदगाव जिल्ह्यातील डोंगरगाव पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या जोधरा गावात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खिलेश्वर असे आरोपी तरुणाचे नाव आहे. खुज्जी मतदारसंघाच्या आमदार छन्नी साहू या एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी जोधरा गावात आल्या होत्या. याच कार्यक्रमात नशेच्या धुंदीत असणाऱ्या आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामागील कारण स्पष्ट झालेले नाही. सध्या आरोपीला डोंगरगाव पोलीस स्थानकामध्ये कैद करण्यात आले आहे. मात्र सत्ताधारी आमदारावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशीनंतर दिलेल्या माहितीनुसार, आमदार छन्नी साहू या मंचावर असताना नशेत असणाऱ्या खिलेश्वर याने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात साहू यांच्या हाताला इजा झाली आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे.
दरम्यान, सत्ताधारी पक्षाच्या आमदारावरच खुलेआम हल्ला झाल्याने विरोधकही आक्रमक झाले आहेत. छत्तीसगडमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याची टीका भाजपने केली आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदारच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांच्या सुरक्षेचे काय? असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम