भाजपविरोधात एकवटले देशातील पंधरा पक्ष !
दै. बातमीदार । २४ जून २०२३ । पाटण्यात शुक्रवारी विरोधी पक्षांची पहली बैठक झाली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अडीच तास चाललेल्या बैठकीत 15 पक्षांचे नेते उपस्थित होते. बैठकीत कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करून नितीश कुमार यांना युपीए चे संयोजक बनवण्याबाबत चर्चा झाली. विरोधी पक्षांची दुसरी बैठक शिमलामध्ये होणार आहे. ही बैठक 10 ते 12 जुलैदरम्यान होऊ शकते. सर्व पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत नितीश कुमार म्हणाले की, सर्वांनी एकत्रितपणे भाजपाविरोधात लढायचे ठरले आहे. निवडणूकही एकत्र लढवण्यावर एकमत झाले आहे. लवकरच सर्व पक्षांची पुढची बैठकही आयोजिक केली जाईल. या बैठकीत कोण, कुठे लढणार याबाबत निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितले.
यावेळी राहुल गांधी म्हणाले, देशाच्या पायावरच हल्ला होत आहे. बीजेपी आरएसएस आक्रमण करत आहेत. मी बैठकीत म्हटले की, आपण सर्व सोबत उभे आहोत. सर्व पक्षांमध्ये काही प्रमाणात आपसांत वैचारिक मतभेद आहेत. पण आपण एकत्र काम करू. जी चर्चा झाली आहे, ती पुढच्या बैठकीत आणखी पुढे नेऊ.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, नितीश कुमार यांनी चांगल्या प्रकारे बैठकीचे आयोजन केले आहे. पाटणामधूनच आंदोलन सुरू होते. दिल्लीमध्ये अनेकदा बैठक झाली. पण त्याचा काहीही निष्कर्ष निघाला नाही. आजच्या बैठकीत तीन गोष्टी स्पष्ट झाल्या. पहिली म्हणजे आपण एक आहोत. दुसरी आपण एकत्र लढू आणि तिसरी म्हणजे भाजप जो पॉलिटिकल अजेंडा आणेल, त्याला आपण विरोध करू. आज इतिहासातील मोठा दिवस आहे.
प्राथमिक माहितीनुसार नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी कलम 370 हटवण्याच्या आम आदमी पार्टीच्या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. सर्व पक्षांनी केंद्राच्या अध्यादेशाविरोधात केजरीवाल यांना पाठिंबा द्यावा असे काँग्रेसला सांगितले आहे. जेडीयूच्या सूत्रांनी माहिती दिली की, बैठकीत ममता बनर्जींनी सर्वांनाच वैयक्तिक महत्वाकांक्षा सोडाव्या लागतील असे म्हटले आहे. कोणीही दबाव निर्माण करण्याच्या प्रयत्न करू नये असे ममतांनी म्हटले काँग्रेस नेते राहुल गांधी आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे शुक्रवारी सकाळी पाटण्याला पोहोचले. राहुल आणि खरगे आधी काँग्रेस मुख्यालयात पोहोचले. येथे कार्यकर्त्यांना संबोधित केले. ते म्हणाले की, आम्ही सर्व मिळून भाजपचा पराभव करू. देशात सध्या दोन विचारधारांचे युद्ध सुरू आहे. एकीकडे काँग्रेसची ‘जोडो भारत’ आणि दुसरीकडे भाजप-
आरएसएसची ‘भारत तोडो’.
या पक्षांचा सहभाग : जेडीयू, आरजेडी, आम आदमी पार्टी, डीएमके, टीएमसी, सीपीआय, सीपीएम, सीपीआय (एमएल), पीडीपी, नॅशनल काॅन्फरन्स, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), सपा, जेएमएम आणि एनसीपी. बैठकीत सहभागी होणारे नेते : तामिळनाडूचे मुख्यमंत्री नेते एम. के. स्टॅलिन, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, डी. राजा, दीपांकर भट्टाचार्य आणि मेहबूबा मुफ्ती. हे सर्व नेते गुरुवारीच पाटण्याला पोहोचले होते. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि जम्मू-काश्मीर नेशनल कॉन्फरन्सचे उमर अब्दुल्ला, सपाचे अखिलेश यादव, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, जेएमएमचे हेमंत सोरेन शुक्रवारी पाटण्याला पोहोचले. यांच्याशिवाय जे डी यु तून नीतीश कुमार आणि आर जे डी कडून तेजस्वी यादव बैठकीत सहभागी होतील.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम