
दै. बातमीदार । १६ नोव्हेबर २०२२ गेल्या काही दिवसापासून ‘हर हर महादेव’ चित्रपटावरून राजकारण तापले होते, त्यानंतर सुनील शेट्टी आणि अनुराग कश्यप स्टारर ‘फाइल नंबर 323’ हा चित्रपट वादात सापडला आहे. दिग्दर्शक कार्तिक. के लवकरच भारतातून फरार झालेल्यांवर चित्रपट बनवणार आहेत. या चित्रपटाची कहाणी विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांसारख्या बड्या उद्योगपतींनी केलेल्या घोटाळ्यांवर आधारित असेल.आता उद्योगपती मेहुल चोक्सीने या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. त्याने निर्मात्यांविरोधात नोटीस बजावून माफीची मागणी केली आहे.
‘फाइल क्रमांक 323’च्या माध्यमातून आपली प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे मेहुल चोक्सीने या नोटीसद्वारे म्हटले आहे. त्याने चित्रपटाचे निर्माते कलोल दास, पार्थ रावल, दिग्दर्शक कार्तिक के आणि चित्रपटाच्या निर्मितीशी संबंधित इतरांविरोधात नोटीसही बजावली आहे. यासोबतच त्यांनी चित्रपटाची निर्मिती थांबवण्याची विनंतीही केली आहे.
निर्माते लवकरच या नोटीसला कायदेशीर उत्तर देतील
या नोटिशीला लवकरच कायदेशीर उत्तर देण्यात येईल असे निर्मात्यांनी सांगितले. तसेच हा चित्रपट कोणाचा बायोपिक नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. ते म्हणाले की, आम्ही अशा लोकांची कथा सांगणार आहोत जे भारतातील मोठ्या आर्थिक गुन्ह्यांमध्ये सामील आहेत. यासोबतच पब्लिक डोमेनवर उपलब्ध असलेल्या माहितीवरच हा चित्रपट बनवत असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘फाइल नंबर 323’ चित्रपटाचे शूटिंग 20 नोव्हेंबरपासून मुंबईत सुरू होणार आहे. याशिवाय यूकेसह युरोपातील विविध देशांमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे. चित्रपटातील नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या पात्रांसाठी काही प्रसिद्ध नावांचाही शोध घेतला जात आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये प्रदर्शित करण्याची निर्मात्यांची योजना आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम