शिंदे गटाची मंत्री पदासाठी चार नावे निश्चित !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ जुलै २०२३ ।  राज्यातील सत्तेत असलेले शिंदे गट व पवार गटात खाते वाटपावरून जोरदार राजकारण सुरु असल्याची राज्यात चर्चा सुरु असतांना अजित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मध्यस्थीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा चिढा सुटल्याचे बोलले जात आहे. तसेच, नव्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा फॉर्म्युला ठरल्याचे समोर येत आहे. त्यानुसार 4-4-2 असा हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यानुसार शिंदे गट आणि भाजपला प्रत्येकी चार मंत्रिपदे मिळणार आहेत. तर राष्ट्रवादीला दोन मंत्रिपदे मिळणार आहेत.

दरम्यान, शिंदे गटाकडून मंत्रिपदासाठी चार नावे निश्चित करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यानुसार आमदार योगेश कदम, अनिल बाबर आणि भरत गोगावले यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. तसेच संजय शिरसाट आणि संजय रायमूलकर या दोघांपैकी एकाचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. फक्त चारच जणांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याने बंड करून आलेल्या आमदारांचा चांगलाच हिरमोड होणार असून धुसफूस वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नव्या मंत्र्यांचा आज किंवा उद्या शपथविधी होण्याची शक्यता असून त्याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष आहे. नव्या विस्तारात एकूण 10 जणांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. दरम्यान, शिंदे गटाकडून मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या चार जणांची नावे निश्चित झाली असली तरी या चारही जणांमध्ये पुरुषांचाच समावेश आहे. शिंदे गटात नव्याने आलेल्या मनिषा कायंदे आणि नीलम गोऱ्हे यांना अजूनतरी संधी दिली नसल्याचे सांगितले जात आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात कमाल मंत्रिपदांची संख्या 43 आहे. सरकारमध्ये सध्या 29 मंत्री आहेत. आज किंवा उद्या 10 जणांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. म्हणजेच अजून तीन मंत्रिपदे रिक्त असतील. याबाबतचा निर्णय कधी होतो व या जागेवर कुणाची मंत्रिपदावर वर्णी लागते हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम