आरक्षणासाठी २४ तासात चार जणांच्या आत्महत्या !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ५ नोव्हेबर २०२३

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु असतांना अनेक तरुणांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना घडत असतांना मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन करून देखील राज्यातील आत्महत्यांचे दुष्टचक्र कुठेही थांबत नाही आहे. गेल्या २४ तासांत याच कारणासाठी बीड, लातूर व छत्रपती संभाजीनगरातील चार जणांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

बीड तालुक्यातील कोळवाडी येथे अमोल रोहिदास नांदे (२५) व कामखेडा येथे प्रेमराज किशोर जमदाडे (२२), चाकूर तालुक्यातील नांदगाव येथे तुकाराम रघुनाथ मोरे (५०) व वैजापूर तालुक्यातील भग्गाव येथील कृष्णा दत्तू जगताप (२०) अशी मृतांची नावे आहेत. भग्गाव येथे कृष्णा जगताप या तरुणाने चिठ्ठीत मराठा आरक्षण न मिळाल्याने आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. बीड तालुक्यातील कामखेडा येथील प्रेमराज जमदाडे या युवकाच्या वडिलांचे ४ महिन्यांपूर्वी अपघाती निधन झाले. तो घरातील सर्वात मोठा होता. कामखेडा येथे ३ एकर तर पाली येथेही काही जमीन आहे. शुक्रवारी रात्री आईसोबत तो पाली येथून कामखेडा येथे आला होता. रात्री शेतात जाऊन गळफास घेतला. आई, छोटा भाऊ, बहीण असा परिवार त्याच्या पश्चात आहे.

चाकूर तालुक्यातील नांदगाव येथील तुकाराम मोरे हे अनेक वर्षांपासून सासरवाडी (नांदगाव) येथे वास्तव्यास होते. मोलमजुरी करून ते पोटाची खळगी भरत होते. त्यांना पत्नी, दोन मुले, नातवंडे आहेत. आष्टामोड येथे मराठा आरक्षणासाठी दहा गावांचे साखळी आंदोलन सुरू होते, त्यात त्यांचाही सहभाग असायचा. शुक्रवारी रात्री ते चिंताग्रस्त असल्याचे कुटुंबीयांना जाणवले. त्यांनी जेवणही केले नाही. ‘उपोषण करून काही फायदा झाला नाही. सरकारने आरक्षण दिले नाही अाणि वेळकाढूपणा केला’, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती. शनिवारी सकाळी शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम