मालगाडीचा अपघात ; वाहतूक विस्कळीत ; जाणून घ्या…कोण-कोणत्या ट्रेन झाल्यात रद्द !
दै. बातमीदार । २४ ऑक्टोबर २०२२ । राज्यात दिवाळी सुरु असतानाच रविवारी रात्री कोळशाच्या मालगाडीचा मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. नागपूर-भुसावळ मार्गावरील मालखेडनजीक कोळशाच्या मालगाडीचे २० डबे रुळावरून घसरले. सुदैवाने यात कोणत्याही स्वरुपाची जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे ५६ गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून १२ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर इतर गाड्यांचा मार्ग वळवण्यात आला आहे. सध्या रेल्वेकडून बचावकार्य सुरू आहे. रेल्वे मार्ग अद्याप पूर्ववत झालेला नाही. हा अपघात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला.
रविवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास टीमटाला ते मालखेड दरम्यान मुख्य रेल्वे मार्गावर मालगाडीचे 15 ते 20 डबे घसरले. कोळसा घेऊन जाणारी ही मालगाडी इंजनसह रुळावरून घसरली. रेल्वे रुळावरून घसरल्यामुळे मोठा आवाज झाला. एकापाठोपाठ रेल्वेचे 15 ते 20 डबे रुळावरून खाली घसरले. मालगाडीचे इंजिन हे रुळाच्या बाजूला कोसळले. तर काही डबे हे रुळावर आडवे झाले. त्यामुळे रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.
या अपघातामुळे नागपूर पुणे मुंबई मार्गावरील अनेक रेल्वे गाड्या रद्द झाल्याने व दुसऱ्या मार्गाने वळवल्याने दिवाळसाठी गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशाना याचा फटका बसला आहे.दरम्यान रेल्वे वाहतूक सुरळीत करून पूर्व पदावर आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने जेसीबीच्या माध्यमातून रूळावरील घसरलेले डबे हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. अपघात स्थळावर रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि तंत्रज्ञ तातडीने दाखल झाले. सध्या 200 कर्मचारी येथील दुरुस्तीचे काम करत आहेत. लवकरच हा मार्ग सुरळीत होईल, असे आश्वासन येथील अधिकाऱ्यांनी दिले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम