
भाजप सेलचा महामंत्री शिंदे गटात दाखल
दै. बातमीदार । १९ ऑक्टोबर २०२२ । राज्यात शिंदे आणि भाजप यांच्या युतीचे सरकार असले तरी स्थानिक पातळीवर वेगळेच चित्र आहे. शिंदे गटाचे नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. तर भाजपचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील भाजप सेलचा महामंत्री शिंदे गटाने फोडला आहे.
एकनाथ शिंदे आणि आमदार शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर भाजपा-शिंदे गट एकत्र आले असले तरी दोन्ही गटांमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरुच आहे. दोन्ही गट एकमेकांचे नेते फोडत आहेत. गटातील लोक फोडाफोडीची माहिती थेट हायकमांड यांच्यापर्यंत पोहचली होती. भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी एकमेकांचे नेते फोडू नका असे आदेश दिले होते. वरुन देण्यात आलेला हा आदेश धुडकावून लावत फोडाफोडीचे राजकारण सुरूच आहे.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाकडून भाजपला मोठा धक्का देण्यात आला आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाने मुंबईतील भाजपचा महामंत्री फोडला आहे. भाजपचे उत्तर भारतीय सेलचे महामंत्री राम यादव आणि त्यांच्या पत्नी रेखा यादव या दोघांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. राम यादव आणि त्यांच्या पत्नी रेखा यादव यांचा शिंदे गटातील प्रवेश हा भाजपला मोठा धक्का मानला जातोय. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थित त्यांनी शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे. भाजपला सोडत बाळासाहेबांच्या शिवसेना (शिंदे गट) मध्ये पक्ष प्रवेश केलेल्या राम यादव यांच्या पत्नी रेखा यादव यांनी नाव न घेता आमदार मनीषा चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केलेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम