विद्यार्थ्यांसाठी खुशखबर : इंग्रजी पेपरमध्ये मिळणार गुण !
दै. बातमीदार । ४ मार्च २०२३ । राज्यात प्रत्येक जिल्ह्यात बारावीच्या विद्यार्थ्यांचे पेपर झाले यंदा बारावी बोर्डाने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मोठा निर्णय घेतला आहे. बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये काही प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या. त्या प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांना आता सहा गुण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बोर्डाने घेतला आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये चुका झाल्याची बातमी समोर आल्यानंतर बोर्डाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. 21 फेब्रुवारीला बारावीचा इंग्रजी विषयाचा पहिला पेपर होता. मात्र यावेळी पेपरमध्ये तीन चूका असल्याचे समोर आले होते. या पेपरमध्ये कविता विभागातील प्रश्नांमध्ये चुका आढळून आल्या. इंग्रजीच्या पेपरमधील तीन प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या. या तीन प्रश्नांना मिळून 6 गुणांची विभागणी करण्यात आली होती.
आता बोर्डाने इंग्रजी पेपरमधील चुकांसाठी विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना आयते एकूण सहा गुण मिळणार आहेत. यात बोर्डाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांचा मात्र फायदा झाला आहे. इंग्रजी पेपरमध्ये चुका आढळल्यानंतर त्याबाबतीत बोर्डाने अहवाल जारी करण्यास सांगितले होते. यामध्ये काही तज्ज्ञांची बैठक झाली आणि ज्या विद्यार्थ्यांनी हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला त्या विद्यार्थ्यांना 6 गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला. दहावी-बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. यादरम्यान कॉपीसारखे अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून मोठी काळजी घेतली जात आहे. मात्र असे असतानाही परीक्षादरम्यान गोंधळाचे प्रकार समोर आले आहेत. याआधी बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये उत्तर छापण्याचा प्रकार समोर आला होता.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम