शासकीय वसतीगृहातील विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा !
बातमीदार | २४ सप्टेंबर २०२३ | राज्यातील एका शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलींच्या शासकीय वसतीगृहातील विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली असून या वसतीगृहातील सहा मुलींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. तर या मुलींना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मुलीवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. यासंदर्भात आमदार श्वेता महाले यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. हि घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिखली येथील या शासकीय मुलींच्या वसतीगृहात गरीब कुटुंबातील 62 मुलींचा प्रवेश आहे. या वसतीगृहातील मुलींना अतिशय निकृष्टदर्जाचे अन्न दिले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. या मुलींना कोणतीही सुविधा याठिकाणी मिळत नाही. मुलींना साधं पिण्याचे शुद्ध पाणी नाही, भोजनात नेहमीच अळ्या पडलेल्या असतात, भाजीपालाही सडलेला असतो, असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या वसतीगृहात दोन विद्यार्थिंनींना झोपण्यासाठी एकच बेडचा वापर करावा लागतो. तसेच या विद्यार्थिंनींना गादी, चादरसुद्धा बदलून मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. ‘ या प्रकरणी समाजकल्याण विभागाचे अधिकाऱ्यांना सांगितले तर वसतिगृहाचे वॉर्डन अस्मिता जोशी या धमकी देतात, शिवाय विद्यार्थिंनींना वसतिगृहातील प्रवेशही रद्द करण्याची धमकी देतात. त्यामुळे मुली आजपर्यंत दबावाखाली जगत असून अन्याय सहन करत असल्याचेही समोर आले आहे. या वसतीगृहासाठी राज्य सरकारचा समाज कल्याण विभाग लाखो रूपयांचा खर्च करते. तरीही मुलींना अळ्या पडलेले शिळे अन्न खाण्यास दिले जाते. त्यामुळे वॉर्डनवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम