आरक्षणासाठी सरकार लागले कामाला ; मुख्यमंत्री आज घेणार मोठा निर्णय !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १ नोव्हेबर २०२३

राज्यात मराठा आरक्षण मिळावे यासाठी आंदोलक आता तीव्र स्वरूपात आंदोलन करू लागले असल्याने आता राज्य सरकार देखील कामाला लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय ३४ नेत्यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर बुधवारी सकाळी साडेदहा वाजता बैठक बोलावली आहे. मराठा आरक्षण आणि बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत या वेळी चर्चा केली जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार या बैठकीला हजर राहणार आहेत.

राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. अनेक ठिकाणी हिंसक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. सरकारने आश्वासने देताना काही निर्णयही घेतले आहेत. मात्र, ते समाधानकारक नसल्याचे म्हणत सलग दोन दिवस मराठा समाजाने घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. आंदोलकांनी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वपक्षीय आमदारांची बैठक बोलावली आहे. सह्याद्रीवर ही बैठक होईल.

सहा मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी खासदार उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती, खासदार सुनील तटकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह २१ नेत्यांना निमंत्रित केले आहे. याशिवाय राज्याचे मुख्य सचिव, गृह, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, पोलीस महासंचालक बैठकीला हजर राहणार आहेत. दरम्यान, मराठा आंदोलकांची मनधरणी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या व्यतिरिक्त शिवसेनेच्या (ठाकरे) आमदार, नेत्यांना या बैठकीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे सरकारच्या कार्यपद्धतीवर शिवसेनेने (ठाकरे) नाराजी व्यक्त करत टीकास्त्र सोडले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम