राज्यात तीन दिवस दमदार पाऊस !
दै. बातमीदार । ३ जुलै २०२३ । राज्यात जून महिना संपलेला असून जुलै महिन्याला सुरुवात देखील झालेली असतांना काही भागात पाणी आहे तर काही भागात अजूनही पाऊस पडलेला नसल्याने मोठी चिंता व्यक्त होत असतांना एक मोठी बातमी समोर आली आहे व हवामान विभागाकडून आनंदाची वार्ता देण्यात आली असून राज्यात तीन दिवस दमदार पाऊस असणार असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
नाशिकसह मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर तसेच विदर्भात तीन दिवस जोरदार तर मराठवाड्यात ठराविक ठिकाणी हलक्या स्वरुपात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, शनिवारी नाशिक, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर वगळता इतर भाग तसेच विदर्भात ढगाळ वातावरण होते. नाशिक जिल्ह्यात दिवसभरात २२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
राज्यातील विविध शहरांतील पाऊस (मिमी) : माथेरान ३१, उस्मानाबाद ३, कुलाबा ७, डहाणू २९, सातारा ८, जळगाव १२, महाबळेश्वर ३२, नाशिक २२, पुणे २, रत्नागिरी ५, सांगली ६, कोल्हापूर ९, ठाणे १२, छत्रपती संभाजीनगर ३. नाशिक / त्र्यंबकेश्वर जिल्ह्यात पावसाचा जोर असून २४ तासांत एकूण २२ मिमी. तर एकट्या त्र्यंंबकमध्ये ६५ मिमी पाऊस झाला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम