ती यादी अतिरेक्यांपर्यंत पोहोचलीच कशी? ठाकरेंनी उपस्थित केला प्रश्न !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ७ डिसेंबर २०२२ । देशात गेल्या वर्षभरात २४ कश्मिरी पंडित आणि बिगर कश्मिरी नागरिकांची अतिरेक्यांनी हत्या केली आहे. त्यात आता ‘टीआरएफ’ या पाकपुरस्कृत अतिरेकी संघटनेने कश्मिरी पंडित असलेल्या 57 कर्मचाऱ्यांची हिटलिस्ट जाहीर करावी, हे धक्कादायक आहे. ही यादी अतिरेक्यांपर्यंत पोहोचलीच कशी?, असा सवाल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केला आहे. तसेच, 370 कलम रद्द केल्यानंतर कश्मीरात सारे काही आलबेल होईल, असा शब्द मोदी सरकारने दिला होता, त्याचे काय झाले? याचा जाब केंद्र सरकारला द्यावाच लागेल, असेही ठाकरेंचे मुखपत्र असलेल्या सामनातून सुनावण्यात आले आहे. गुजरातच्या निवडणुका संपल्या आहेत. आता तरी केंद्रातील सत्तापक्ष ‘इलेक्शन फिव्हर’मधून बाहेर पडून कश्मिरी पंडित आणि देशावर आलेल्या या संकटाचा मुकाबला करण्यासाठी वेळ काढेल काय?, असा टोलाही ठाकरेंनी लगावला आहे.

ठाकरेंनी म्हटले आहे की, देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री गुजरात विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी प्राणपणाने व्यूहरचना आखण्यात मश्गूल असतानाच जम्मू-कश्मीरात मात्र पाकपुरस्कृत अतिरेकी संघटनेने कश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाचे कट-कारस्थान रचल्याची भयंकर बातमी आहे. इकडे केंद्रातील सत्तापक्ष गुजरातच्या प्रचारसभांत, निवडणुकीच्या जोड-तोडीपासून रोड शोपर्यंतचे सूक्ष्म नियोजन करण्यात गुंतला असतानाच तिकडे कश्मीर खोऱ्यात तैनात असलेल्या 57 कश्मिरी पंडित सरकारी कर्मचाऱ्यांची गोपनीय यादीच दहशतवाद्यांनी आपल्या वेबसाईटवर जाहीर केली आहे. एका अर्थाने ही माहिती फोडून अतिरेक्यांनी कश्मिरी पंडितांची हिटलिस्टच जाहीर केली आहे.

ठाकरे म्हणाले, कश्मीर खोरे तत्काळ सोडा; अन्यथा टार्गेट किलिंग करू, अशी खुलेआम धमकीच या अतिरेक्यांनी कश्मिरी पंडित-कर्मचाऱ्यांना दिली आहे. मुळात ही यादी अतिरेक्यांपर्यंत पोहोचलीच कशी? केंद्र सरकार व जम्मू-कश्मीर प्रशासनाला याचा जाब द्यावाच लागेल. पंतप्रधान पुनर्वसन पॅकेजअंतर्गत कश्मिरी पंडितांना खोऱ्यात वेगवेगळय़ा ठिकाणी सरकारी विभागांत नेमणुका देण्यात आल्या आहेत. मात्र गेल्या वर्षभरात दहशतवाद्यांकडून कश्मिरी पंडितांची वेचून हत्या केली जात आहे. शिक्षक, बँक अधिकारी, कर्मचारी यांच्या सातत्याने सुरू असलेल्या ‘टार्गेट किलिंग’मुळे कश्मिरी पंडितांमध्ये आधीच भय व दहशतीचे वातावरण आहे. त्यात लष्कर-ए-तोयबासोबत काम करणाऱ्या ‘द रेजिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) या अतिरेकी संघटनेने कश्मीर खोऱ्यात कार्यरत असलेल्या पंडित कर्मचाऱ्यांची यादीच जाहीर करून खळबळ उडवून दिली आहे. यापैकी बहुतांश जण खोऱ्यात शिक्षक म्हणून काम करतात. ठाकरे म्हणाले की, टीआरएफ या अतिरेकी संघटनेचा ‘कश्मीर फाईट’ नावाचा ब्लॉग असून, ते या पाक अतिरेकी संघटनेची अधिकृत भूमिका जाहीर करणारे मुखपत्र मानले जाते. टीआरएफने कश्मिरी पंडितांना धमकावणाऱ्या या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, ‘कश्मीर खोऱ्यात कार्यरत असलेल्या सर्व 57 कश्मिरी पंडितांची हिटलिस्ट आमच्याकडे आहे, त्यांनी तातडीने खोरे सोडावे; अन्यथा त्यांना इथे राहण्याचे गंभीर परिणाम भोगवे लागतील.’ हे कश्मिरी पंडित कोणत्या गावात, शहरात, कोणत्या शाळेत वा सरकारी कार्यालयांत काम करतात, याची सविस्तर माहिती अतिरेक्यांनी प्रत्येकाच्या नावासह जाहीर केली आहे. पंतप्रधान पुनर्वसन पॅकेजअंतर्गत कश्मीर खोऱ्यात 19 ठिकाणी कश्मिरी पंडितांसाठी 6 हजार फ्लॅटस् उभारण्याचे जे काम सुरू आहे, ते आम्हाला कदापि मान्य नाही. या फ्लॅटस्चा स्वीकार कश्मिरी पंडितांनी करू नये आणि याउपरही पंडितांनी ही घरे घेतलीच तर त्या सर्वांची नावेही आम्ही जाहीर करू, अशी थेट धमकीच या पाकिस्तानी संघटनेने दिली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम