मी पाणी पितो तुम्ही जीआर आणा ; मनोज जरांगे !
बातमीदार | ४ सप्टेंबर २०२३ | राज्यातील जालना जिल्ह्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुरु असलेल्या आंदोलनात आज अनेक मान्यवर भेटी घेण्यासाठी येत आहेत. मराठा आरक्षणावर उपसमितीच्या बैठकीत तोडगा निघाला असल्याचं सुत्रांकडून कळतं आहे. यापार्श्वभूमीवर अर्जुन खोतकर आणि महादेव जानकर यांनी मनोज जरांगे यांची उपोषणस्थळी सरकारचे प्रतिनिधी म्हणून भेट घेतली.
यावेळी “मी पाणी पितो, तुम्ही आरक्षण जाहीर झाल्याचा जीआर घेऊन या” असं आवाहन जरांगे यांनी चर्चेदरम्यान त्यांना केलं. दरम्यान, थोड्याचवेळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पत्रकार परिषद घेऊन बैठकीतला निर्णय जाहीर करणार आहेत. मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत तोडगा निघाल्याची चर्चा आहे. पण नेमकी काय चर्चा झाली? याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. पण लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेऊन या उपसमितीच्या बैठकीत काय निर्णय झाला? याची माहिती देणार आहेत.
दरम्यान, जरांगे ज्या प्रमुख मागणीसाठी उपोषणाला बसले होते ती म्हणजे मराठवाड्यातील मराठ्यांना निजामाच्या काळापासून कुणबी म्हणून आरक्षण मिळत होतं त्याचे पुरावे देखील सापडले आहेत. या पुराव्यांच्या आधारे सरकारनं राज्यातील सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून आरक्षण जाहीर करावं. त्यामुळं जरांगेंच्या या दाव्यानुसार, उपसमितीच्या बैठकीत तोडगा निघाला की आणखी काही वेगळा निर्णय घेण्यात आला आहे, हे मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतरच स्पष्ट होणार आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम