खंडणीप्रकरणी : अखेर सचिन वाझेचा जामीन मंजूर
बातमीदार | २ ऑक्टोबर २०२३
राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता असतांना राज्यात एक मोठे प्रकरण खूप गाजले होते. हॉटेल मालकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याला विशेष सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. २०२१ मध्ये हॉटेल मालकाने केलेल्या तक्रारीवरून वाझे याच्यावर खंडणीची गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी वाझे याने महानगर दंडाधिकारी यांच्याकडे जामीन अर्ज केला. मात्र, दंडाधिकाऱ्यांनी त्याचा अर्ज ऑगस्टमध्ये फेटाळल्याने त्याने विशेष न्यायालयात धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, अँटिलिया स्फोटके व ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन हत्येप्रकरणी वाझे न्यायालयीन कोठडीत आहे. खंडणीप्रकरणी वाझेला नोव्हेंबर २०२१ मध्ये अटक करण्यात आली. विशेष सीबीआय न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर वाझेची जामिनावर सुटका केली. ऑगस्ट २०२१ मध्ये गोरेगाव पोलिसांनी हॉटेल व्यावसायिक बिमल अगरवाल यांच्या तक्रारीवरून माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांच्यावर खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला. ११.९२ लाख रुपये न दिल्यास गुन्हा दाखल करू, अशी धमकी आरोपींनी दिली. हा गुन्हा जानेवारी २०२० ते मार्च २०२१ दरम्यान घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून सीबीआयकडे वर्ग करण्यात आला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम