राज्यातील काही भागात पावसासह उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज !

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ एप्रिल २०२३ ।  राज्यात गेल्या काही दिवसापासून बदलत्या हवामानामुळे अनेक भागातील शेतकरीचे नियोजन कोसळताना दिसून येत आहे. राज्यातील काही भागात पावसाचे संकेत तर काही भागात उन्हाचा चटका वाढणार असून कमाल तापमानात आणखी वाढ होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

विदर्भात पारा 40 अंशांच्या पुढे गेला आहे. तसेच, शुक्रवारी (31 मार्च) काही ठिकाणी तुरळक पावसानेही हजेरी लावली. आजदेखील विदर्भ तसेच, उत्तर महाराष्ट्र व उत्तर कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या 24 तासांमध्ये वर्धा येथे देशातील उच्चांकी 40.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या हंगामात प्रथमच पारा चाळिशीपार गेला आहे. विदर्भात बहुतांशी ठिकाणी तापमान 38 अंशांच्या पुढे आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान 34 ते 37 अंशांच्या दरम्यान आहे. किमान तापमानातही चांगलीच वाढ झाली असून बहुतांश ठिकाणी पारा 15 ते 15 अंशांच्या दरम्यान आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य उत्तर प्रदेशापासून मध्य प्रदेश, विदर्भ, ते तेलंगणापर्यंत समुद्रसपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागापासून उत्तर ओडिशापर्यंत आणखी एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर, तसेच उत्तर प्रदेशात समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत. यामुळे पावसाला पोषक हवामान असल्याने विदर्भासह राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान आहे. तर तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आज उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात हलक्या पावसाची शक्यता आहे.
राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली असतानाच शुक्रवारी (ता.31) दुपारनंतर छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नगर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार सरी कोसळल्या. या पावसाने काढणीस आलेल्या गहू, हरभऱ्यासह कांदा पिकाचे नुकसान होणार आहे. आंबा पिकालाही या पावसामुळे फटका बसणार आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात विजांसह पावसाची शक्यता आहे. तसेच उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले असून आज विदर्भात 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली याठिकाणी वादळी वाऱ्याचा अंदाज आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम