शिक्षणात भारतीय ज्ञानपरंपरेचा समावेश म्हणजे विकसित देशाच्या दिशेने वाटचाल : श्री. भुजंग बोबडे

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रचारार्थ जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरे”वर मार्गदर्शन

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ८ एप्रिल २०२४ | नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार समृद्ध प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेचे ज्ञान विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने ‘इंडियन नॉलेज सिस्टीम’ याचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.. शाळांपासून ते विद्यापीठीय शिक्षणापर्यंतच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये भारतीय ज्ञानाविषयीची माहिती अंतर्भूत केली जाणार असून याच अनुषंगाने जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात इंटर्नल क्वालिटी असुएर्नेस सेल इस्टीट्युशनल आयकेएस सेंटर व भारतीय शिक्षण मंडळ जळगाव जिल्हा देवगिरी प्रांताच्या माध्यमातून “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व भारतीय ज्ञानपरंपरा” या विषयांवर नागपूर येथील रिसर्च फॉर रिसर्जेन्स फाऊंडेशनच्या नॉलेज रिसोर्स सेंटरचे संचालक व भारतीय शिक्षण मंडळाच्या अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य श्री. भुजंग बोबडे यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात व्यासपीठावर जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अॅकड्मिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत तसेच नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य एल. पी. देशमुख, व खिरोदा येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. लता मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद कि, जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट हे एक ऑटोनोमस इन्स्टिट्यूटशन असल्याने आम्ही प्रभावीरित्या नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवीत असून यात युनिवर्सल ह्युमन व्हेल्यू व ‘इंडियन नॉलेज सिस्टीम’ चे अद्यावत सेंटर असून या सेंटरच्या माध्यमातून समृद्ध प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेचे ज्ञान विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सतत कार्यरत असतो तसेच आज भारतीय शिक्षण मंडळ जळगाव जिल्हा देवगिरी प्रांत याच्या संयुक्त विध्यमाने इतिहासतज्ञ श्री. भुजंग बोबडे यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन रायसोनी इस्टीट्युट करीत आहे. मुळात कोणत्याही देशाच्या व्यक्तिमत्वावर त्या देशाच्या वर्तमानाचा जितका प्रभाव असतो, तितकाच भूतकाळाचादेखील असतो. मुळात ‘भारतीय ज्ञान परंपरा’ ही अत्यंत समृद्ध अशी आहे. ज्ञान आणि विज्ञान, लौकिक आणि पारलौकिक, कर्म आणि धर्म तसेच भोग आणि त्याग यांचा अद्भुत समन्वय भारतीय ज्ञान परंपरेत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये भारतीय ज्ञान परंपरेवर भर देण्यात आलेला आहे. सुसंस्कारासोबतच मातृभाषा आणि शारीरिक शिक्षणाचाही सांगोपांग विचार या नव्या शैक्षणिक धोरणात करण्यात आलेला आहे. प्राचीन काळी गुरूंना सर्वश्रेष्ठ समजले जात असे. नव्या धोरणातही केंद्रस्थानी शिक्षक आहेत. सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडविताना शिक्षकांकडूनही निस्वार्थी, त्यागी आणि ज्ञान संपन्न असण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे. भारतीय शिक्षण व्यवस्थेचे जगभरात जे स्थान प्राचीन काळी होते, तेच परत मिळविण्यासाठी नवे शैक्षणिक धोरण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. यानंतर कार्यक्रमातील प्रमुख वक्ते श्री. भुजंग बोबडे यांनी मार्गदर्शन करतांना नमूद केले कि, भारताची उज्ज्वल ज्ञानपरंपरा व प्राचीन भारताचा इतिहास हा समृद्ध ज्ञान परंपरांचा इतिहास आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. काळाच्या ओघात विविध कारणांमुळे ज्ञानाचा वारसा खंडित झाला.

 

भारतीय ज्ञानपरंपरेकडे दुर्लक्ष करून पाश्चिमात्य शिक्षणपद्धतीला आलेले अवाजवी महत्त्व; एकेकाळची ज्ञानभाषा असणाऱ्या संस्कृत भाषेबद्दलची उदासीनता; पाली, अर्धमागधी यांसारख्या भाषांचा झालेला ऱ्हास यामुळे अनेक विषयांमधले ज्ञानभांडार विस्मृतीच्या गर्तेत जात आहे “एखाद्या समाजाचा, प्रांताचा वा देशाचा इतिहास म्हणजे तत्कालीन सामाजिक, वैचारिक, आर्थिक, व राजकीय परिस्थितीच्या सर्वांगीण विकासाची हकीकत; त्या परिस्थितीचा परस्परांवर तत्कालीन व समाजजीवनावर होणारा परिणाम; यातून निर्माण होणारे साहित्य, कला व शास्त्र आणि या घटनांचे बुद्धिवादी मूल्यमापन म्हणजे इतिहास होय. तसेच भारतीय ज्ञानामध्ये मूलभूत ज्ञान, विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, खगोलशास्त्र, आयुर्वेद, योग, गणित, संगणन, भाषाशास्त्र, धातूशास्त्र, रस-शास्त्र, सार्वजनिक प्रशासन, युद्ध तंत्रज्ञान, व्यवस्थापन विज्ञान, सामाजिक विज्ञान आणि इतरही अनेक विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. भारतीय विचार आणि तत्त्वज्ञानामध्ये ज्ञान, प्रज्ञा आणि सत्य यांचा शोध हे नेहमीच सर्वोच्च मानवी ध्येय मानले गेलेले आहे.

 

भारतातील शिक्षणाचे उद्दिष्ट केवळ या भौतिक जीवनाचा विकास किंवा शालेय शिक्षणाच्या पलीकडे नौकरीची तयारी म्हणून ज्ञान संपादन करणे हे नव्हे तर आत्मिक विकासाच्या पलीकडे जाऊन विश्वकल्याण साधणे हे आहे तसेच जागतिक स्तरावर आपण नेहमी नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला या विद्यापीठांचा गुणगौरव गात असतो परंतु आपल्या शेजारी असणारी पाटणादेवी, चांगदेव ही देखील कधीकाळी ज्ञानसाधनेची प्रमुख स्थाने होती हे मात्र आपण विसरून जातो, अशा स्थानिक उत्तम व अनुकरणीय बाबींचे दस्तऐवजीकरण झाले पाहिजे व त्या पुन्हा आपल्या आचरणात आल्या पाहिजेत या साठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करने अत्यंत आवश्यक आहे. तसेच इतिहासाच्या दालनात हस्तलिखित ग्रंथाना अनन्यसाधारण महत्व असते, हे विसरून चालणार नाही. याच हस्तलिखित ग्रंथामध्ये आपणाला तत्कालीन जीवनाचे स्पष्ट प्रतिबिंब पडलेले दिसते. फक्त पाहणाऱ्याला हवी ऐतिहासिक दृष्टी आणि बौध्दीक कुवत. ती ज्याला नाही, त्याला यात दडलेली सत्य उकलणार नाहीत आणि असा विद्वान इतिहासाची मात्र माती करील याबद्दल शंका नाही. इतिहास हे शास्त्र आहे, शास्त्राला संकुचित मर्यादा असूच शकत नाहीत. तसेच भारतात खाण्यापासून राहण्यापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीला विशिष्ट कारण आणि इतिहास आहे, असे मानले जाते.

 

भारतात कोणतीही गोष्ट काल-आजकडे जन्माला आलेली नाही, तर ती दीर्घ काळापासून येथे अस्तित्वात आहे. भारतीय ज्ञान परंपरांविषयी केवळ भारतीयांना आदर व कुतूहल नसून जगभरातील विद्वानांच्या लेखनात त्याचा आदराने उल्लेख केलेला आढळून येतो. त्यामुळे नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार समृद्ध प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेचे ज्ञान विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय नक्कीच यशस्वी ठरेल यात शंका नाही असे त्यांनी यावेळी म्हटले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया टेकवानी यांनी केले तर आभार अॅकड्मिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी मानले.

 

भुजंग रामराव बोबडे वय 42 वर्ष. जन्मगाव कर्नाटकाच्या बिदर जिल्ह्यातील लखनगाव आणि सर्व शिक्षण झाले ते लातूर जिल्ह्यातील उदगीर या ठिकाणी. एक वर्ष इतिहास विषयाचा प्राध्यापक म्हणून काम, पुढे आंध्र प्रदेश शासनाच्या पुराभिलेखागार विभागात रिसर्च स्कॉलर म्हणून कार्य करत असतंनाच केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या “राष्ट्रीय हस्तलिखित संशोधन मिशन” मध्ये महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, इ. राज्यांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर दक्खन पुरातत्व व सांस्कृतिक संशोधन केंद्र हैद्राबाद येथे हस्तलिखित संशोधन विभागाचा संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या खानदेश पुराभिलेखागार विभागाचे तसेच गांधी संशोधन केंद्राचे समन्वयक म्हणून रुजू झाले. याच वेळी जैन हिल्सवर पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांनी उभारलेल्या आंतरराष्ट्रीय गांधी रिसर्च फाउंडेशन येथे 8 वर्ष कार्यरत होते. दक्खन पुरातत्व व सांस्कृतिक संशोधन केंद्र हैद्राबाद येथे पुराभिलेखागार व वस्तुसंग्रहालय विभागाचा मानद संचालक म्हणून 2009 पासून त्यांच्याकडे कार्यभार आहे. सध्या ते नागपूर येथील भारतीय शिक्षण मंडळाच्या रिसर्च फॉर रिसर्जन्स फाउंडेशनमध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत. तिरुमला तिरुपती देवस्थानसह महाराष्ट्र शासनाच्या व विविध शैक्षणिक संस्थांच्या 18 वस्तुसंग्रहालय समित्यांचे, 11 शासकीय समिती व महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी बडोदा सह इतर 5 विद्यापीठे व 5 स्वायत्त महाविद्यालयांच्या अॅकड्मिक कौन्सिलचे तसेच BoS कमिटीचे सदस्य म्हणूनही ते आपली जबाबदारी पार पाडत आहेत. आंध्रप्रदेश शासन, आयुष मंत्रालय भारत सरकार, शिक्षण विभाग भारत सरकार इ.च्या विविध प्रकल्पांचे प्रमुख व आंतरराष्ट्रीय वस्तुसंग्रहालय समितीचे ही ते सध्या सदस्य आहेत. आत्तापर्यंत त्यांचे 3 एन्सायक्लोपीडिया सह 23 संशोधन ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम