इस्त्रायल -हमास हल्ला : ५ कमांडर ठार

बातमी शेअर करा...

बातमीदार | २८ ऑक्टोबर २०२३

लढाऊ विमाने, ड्रोन, रणगाड्यांच्या संरक्षणात इस्रायली सैनिकांनी गुरुवारी रात्री गाझा पट्टीत दुसऱ्यांदा मर्यादित कारवाई केली. पूर्ण क्षमतेने लष्कर घुसवण्यापूर्वी हमासचे तळ आणि रणगाडे भेदी क्षेपणास्त्र यंत्रणा उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली. हमासचे ५ कमांडर मारल्याचा इस्रायलचा दावा आहे. तर इस्रायलच्या हल्ल्यात ५० ओलिस मृत्युमुखी पडल्याचा आरोप हमासने केला आहे. दुसरीकडे संयुक्त राष्ट्रात पॅलेस्टाईनने गाझातील बॉम्बवर्षाव थांबवण्याची विनंती केली. परंतु हमासचे समूळ उच्चाटन केल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे इस्रायलकडून स्पष्ट करण्यात आले.

हमासच्या रॉकेट हल्ल्यामुळे २१ दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या संघर्षात इस्रायलकडून पहिल्या दिवसांपासून गाझा पट्टीत हवाई हल्ले करण्यात येत आहेत. हमास नियंत्रित या प्रदेशात मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाई करण्याची इस्रायलची तयारी सुरू आहे. या तयारीचा एक भाग म्हणून गुरुवारी रात्री इस्रायली लष्कराने गाझा पट्टीत पुन्हा एकदा मर्यादित कारवाई केली. गाझा सिटीलगतच्या शिजैयाह नामक शहराच्या बाह्य भागाला लक्ष्य करण्यात आले. कारवाई करून आमचे सैनिक कोणत्याही जीवितहानीशिवाय माघारी परतल्याचे इस्रायली लष्कराने शुक्रवारी सांगितले. यापूर्वी गुरुवारी इस्रायली रणगाडे गाझा पट्टीत घुसले होते. तर रविवारी रात्रीदेखील इस्रायली सैनिकांनी मर्यादित लष्करी कारवाई केली होती. याशिवाय इस्रायली लढाऊ विमाने आणि ड्रोन्स गाझा पट्टीत सातत्याने बॉम्बहल्ले करत आहेत. गाझातील आरोग्य मंत्रालयाच्या दाव्यानुसार इस्रायलच्या हल्ल्यात ७३००हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये ३ हजारांहून अधिक लहान मुले आणि १५०० हून अधिक महिलांचा समावेश आहे. तर शरणार्थी शिबीर, रुग्णालये, प्रार्थनास्थळांचा आडोसा घेत हमासचे दहशतवादी लपत असल्याचा इस्रायलचा दावा आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम