सतत हँग होणाऱ्या मोबाईलप्रमाणे जनतेने सरकार बदलविले ; पंतप्रधान मोदी !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २८ ऑक्टोबर २०२३

२०१४ या वर्षी सतत हँग होणाऱ्या मोबाईलप्रमाणे लोकांनी कालबाह्य झालेले सरकार बदलले आणि आम्हाला संधी दिली, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला. राजधानीत आयोजित इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये ते बोलत होते. एकविसावे शतक भारताचे आहे. काही वर्षांपूर्वी मोबाईल आयातदार असलेला भारत आता निर्यातदार झाला असून आपला देश लवकरच सिक्स-जी क्षेत्रात देखील आघाडीवर असेल, असे प्रतिपादन मोदींनी केले.

दिल्लीतील प्रगती मैदानावर शुक्रवारी इंडिया मोबाईल काँग्रेसचे (आयएमसी) पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी आपल्या भाषणात मोदींनी दूरसंचार क्षेत्रात आपल्या सरकारने केलेल्या कामांचा उल्लेख करतानाच विरोधकांवरही टीका केली. टूजी घोटाळ्याचाही मोदींनी उल्लेख केला. टूजी स्पेक्ट्रम वाटपात यूपीए सरकारचे घोटाळा जगाने पाहिले. आम्ही कोणत्याही घोटाळ्याविना फोरजीचा विस्तार केला. सर्वात वेगवान फाईव्हजी नेटवर्क सुरू केले, असे मोदी म्हणाले. तसेच भारत लवकरच सिक्सजी तंत्रज्ञानाच्या बाबतीत जगाचे नेतृत्व करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधानांनी आकडेवारीचा दाखला देत मोबाईल आयातदार देश असलेला भारत निर्यातदार झाल्याचा दावा केला. सॅमसंग त्यांचे फोल्ड-५ मॉडेल, अॅप्पलचा आयफोन- १५ भारतात तयार होते आहे. गुगलदेखील त्यांच्या पिक्सेलची भारतात निर्मिती करणार आहे. आज संपूर्ण जग मेड इन इंडिया फोन वापरत असल्याचे मोदी म्हणाले. तंत्रज्ञानाचा सर्वांना फायदा व्हावा, यासाठी आपले सरकार आग्रही असल्याचे नमूद करत मोदींनी शिक्षण, पर्यटन, आरोग्य आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी तंत्रज्ञानाचे फायदे सांगितले. देशात सेमीकंडक्टरच्या निर्मितीसाठी सरकारने ८० हजार कोटींची योजना आणली असून भारत लवकरच जगाचीही गरज भागवेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. इंडिया मोबाईल काँग्रेस आशियातील सर्वात मोठे दूरसंचार, तंत्रज्ञान व्यासपीठ आहे. परिषदेचे हे सातवे वर्ष आहे. परिषदेत जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी, एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल, आदित्य बिर्ला समूहाचे प्रमुख कुमार मंगलम बिर्ला सहभागी झाले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम