खासदारांची घेतली पंतप्रधान मोदींनी बैठक अन सांगितले हे गुपित !
बातमीदार | ४ ऑगस्ट २०२३ | भारतीय जनता पार्टीला हरविण्यासाठी देशातील सर्वच पक्षातील विरोधक एकत्र येत बैठका सुरु झाल्या आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बुधवारी रात्री राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) ४८ खासदारांसोबत बैठक घेतली. तीत विरोधी आघाडीवर निशाणा साधत ते म्हणाले की, ही युती नाईलाजातून तयार झाली आहे. विरोधी पक्षाचा एकही खासदार तुम्हाला ‘इंडिया’चा अर्थ सांगू शकत नाही.
संसदेच्या ॲनेक्सी इमारतीत झालेल्या या बैठकीत पंतप्रधानांनी खासदारांना सांगितले की, गरीब ही सर्वांत मोठी जात आहे, त्यासाठी काम करा. केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. राज्य यंत्रणेच्या मदतीशिवाय या योजनांचा लाभ गैर-भाजपशासित राज्यांमध्ये जनतेपर्यंत पोहोचवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, खासदारांनी शक्य तितके त्यांच्या लोकसभा मतदारसंघात राहावे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करावी. सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त चालवले जाणारे ‘जनसंपर्क अभियान’ सातत्याने पुढे न्यावे लागेल आणि निवडणुकीला अवघे काही महिने बाकी असल्याने पूर्ण उत्साहाने काम करावे लागेल.
एका दिवसात २ क्षेत्रांच्या बैठका पंतप्रधान मोदींनी बुधवारी प्रथम उत्तर प्रदेशातील काशी आणि अवध भागातील एनडीएच्या खासदारांची महाराष्ट्र भवनात बैठक घेतली. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, अनुप्रिया पटेल आणि महेंद्र नाथ पांडे तिसऱ्या बैठकीत उपस्थित होते.क्षेत्र ४ च्या दुसऱ्या बैठकीला तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, पुद्दुचेरी, अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीपमधील खासदारांनी हजेरी लावली. या बैठकीला भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, प्रल्हाद जोशी आणि व्ही.मुरलीधरन पांडे उपस्थित होते. १० दिवसांत एनडीएच्या सर्व खासदारांना भेटण्याची पंतप्रधान मोदींची योजना आहे. भाजपने एनडीएच्या खासदारांची ११ क्षेत्रांमध्ये (क्लस्टर) विभागणी केली आहे. केंद्रीय मंत्री संजीव बालयन, बीएल वर्मा, धर्मेंद्र प्रधान आणि शंतनू ठाकूर हे मोदी आणि खासदारांमधील बैठकीची तयारी करत आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम