पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी बारणे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणणे महत्त्वाचे – चंद्रशेखर बावनकुळे

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ७ एप्रिल २०२४ | पुणे- मावळ | पंतप्रधान मोदी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचा विजय भाजपसाठी अगदी महत्त्वाचा आहे, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांना चर्चा करताना सांगितले.

 

मावळ लोकसभा मतदारसंघातील ( भाजपचे )भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक काल पुण्यात पार पडली. सदर प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आमदार अश्विनी जगताप, प्रशांत ठाकूर, उमा खापरे, पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप तसेच शरद बुट्टे पाटील, अविनाश कोळी, विक्रांत पाटील, बाळासाहेब पाटील आदी मान्यवर देखील उपस्थित होते.

 

मावळ लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला मिळावा अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची आग्रही मागणी होती. महायुतीच्या जागा वाटपात मावळची जागा शिवसेनेकडेच कायम राहिल्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजी होती. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व कार्यकर्त्यांना पक्षाची भूमिका समजावून सांगितली.

 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भाजप आणि शिवसेनेची युती खूप जुनी आहे. मध्यंतरी उद्धव ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेतल्यामुळे सर्वाधिक आमदार असूनही आपल्याला अडीच वर्षे विरोधात बसावे लागले होते. मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठे धाडस व त्याग केल्यामुळे आपण महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत आलो, हे कदाचित विसरून चालणार नाही. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी महायुतीचा निर्णय घेतला आहे. तसेच, त्याचे पालन करीत आपण सर्व मित्र पक्षांना एकत्र घेऊन काम करणे आवश्यक आहे.
मावळचीच काय तर रामटेकची जागा देखील महायुतीत शिवसेनेला सोडली आहे. नरेंद्र मोदी यांनी ‘अब की बार चार सौ पार’ हे लक्ष्य निर्धारित केले आहे. विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही किंतु-परंतु मनात न ठेवता झोपून देऊन काम केले पाहिजे. मोदी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी मावळात धनुष्यबाण हे चिन्ह आहे, हे खरोखर जाऊन मतदारांना सांगा व खासदार श्रीरंग बारणे यांना निवडून आणा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

 

खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांची भूमिका भाजप कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट केली. ‘मी आत्तापर्यंत महायुती म्हणून चार निवडणुका एकत्र लढवल्या आहे. चिंचवड विधानसभेची निवडणूक व लोकसभेची ही तिसरी निवडणूक मी लढवत आहे. माझ्या सर्व निवडणुकांमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मला खूप मोठी मदत केली आहे. त्याची जाणीव मी देखील सातत्याने ठेवली. आतापर्यंत कोणतेही चुकीचे काम मी केलेले नाही. मध्यंतरी काही काळ विरोधात बसावे लागले तरी आपण कधीही भाजपच्या विरोधात वक्तव्य केले नाही. पक्षीय दृष्टिकोन डोळ्यापुढे न ठेवता आपण सर्वांची कामे केली,’ याकडे खासदार श्रीरंग बारणे यांनी लक्ष वेधले.

 

कोविडच्या काळात खासदारांना निधी मिळाला नव्हता. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी निधी उपलब्ध करून दिला. पुणे जिल्ह्याच्या निधी वाटपाची जबाबदारी बाळा भेगडे यांच्यासह काही भाजपच्या नेत्यांकडे आहे. त्यामुळे या संदर्भातील आरोप गैरसमजुतीतून आहेत. या व्यतिरिक्त भाजपच्या कार्यकर्त्यांना काही शंका असतील तर त्या देखील चर्चेतून दूर केल्या जातील, अशी ग्वाही खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी खासदार बारणे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम