इतिहासात होणार नोंद : ‘महाराष्ट्र भूषण’च्या तयारीला आला वेग !
दै. बातमीदार । ११ एप्रिल २०२३ । राज्य सरकारतर्फे १६ एप्रिल रोजी खारघर येथीस कॉर्पोरेट पार्क येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठी सिडको व पनवेल महापालिकेतर्फे खारघरमध्ये सुशोभीकरणासह अन्य तयारीला वेग आला आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यक्रमस्थळाला भेट दिली.
ज्येष्ठ समाजसेवक आणि निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार देऊन ‘महाराष्ट्र भूषण’ या पुरस्काराची उंची वाढणार आहे. त्यामुळे या सोहळ्याची इतिहासात नोंद होईल, असा हा भव्य सोहळा होईल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला देशभरातून तब्बल २० लाख श्री सदस्य सहभागी होतील, असा अंदाजही शिंदे यांनी या वेळी व्यक्त केला. या भेटीदरम्यान मैदान, रस्ते, श्री सदस्यांची बैठक व्यवस्था, मंच आदी नियोजनाची शिंदे यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. याप्रसंगी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर, ठाणे पालिका आयुक्त अभिजीत बांगर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे उपस्थित होते.
३३२ एकर जमीन, एक हजार फिरती शौचालये तैनात
३० ते ४० हजार वाहनांसाठी भव्य वाहनतळ
विविध राज्यांतून येणाऱ्या श्री सदस्यांसाठी रंगनिहाय बैठक व्यवस्था
एनएमएमटी आणि बेस्टच्या ५०० आणि टीएमटीच्या २०० बस
अग्निशमन विभागाचे १० बंब
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम