जम्मू- काश्मीरमधील इसमाला जिल्ह्यात लुटले !
बातमीदार | २४ नोव्हेबर २०२३
स्वस्तात तांबे विक्रीचे आमिष दाखवत जम्मू- काश्मीरमधील इसमाला तालुक्यातील कुन्हा-काकोडा येथे बोलवण्यात आले. त्यानंतर मारहाण करून त्याच्याकडील ३० हजार रुपये लुटण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी कुन्हा काकोडा (ता. मुक्ताईनगर) येथील चार जणांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू- काश्मीर पुलवामा जिल्ह्यातील रत्नापुरा येथील रहिवासी सईद नूर मोहम्मद अदराबी (वय ४५) यांची फसवणूक झाली असून सहायक पोलिस निरीक्षक संदीप दुनगहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, परमेश्वर भोलाणकर (२३), राम ऊर्फ दिगंबर सोनवणे (२०), अमोल घाटे (२७) आणि महादेव भोलाणकर (२७), चौघे रा. कुन्हा काकोडा ता. मुक्ताईनगर यांनी कमी दरात तांबे विक्री केली जात असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर टाकला. त्यावरून सईद नूर मोहम्मद यांनी त्यांच्याशी संपर्क साधला.
यावर चारही जणांनी त्यांचा विश्वास संपादन करीत मंगळवारी खंडवा येथे रेल्वेने बोलावून घेतले. तिथून त्यांना चारचाकी वाहनाने काकोडा शिवारात आणले. तिथे सईद यांना मारहाण करीत त्यांच्याकडील ३० हजारांची रोख रक्कम हिसकून घेतली आणि जखमी अवस्थेत आशिया, महामार्गावरील साखर कारखान्याजवळ त्यांना सोडून दिले. सईद अदराबी याचा अंगठ्या विक्रीचा व्यवसाय आहे. अमिषा पोटी त्याच्यावर हा प्रसंग बेतल्याचे त्यांनी सांगितले. घटना घडल्यानंतर मुक्ताईनगर पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याची जेवणाची व्यवस्था केली आणि मदत देऊन घराकडे रवानगी केली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम