महात्मा गांधीजींची ती सायकल आता पाहू शकतो गांधीतीर्थमध्ये!
दै. बातमीदार । १५ सप्टेंबर २०२२ । भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्यावेळी उत्तरप्रदेश मधील सिद्धार्थनगर तालुक्यातील जोगिया येथील स्वातंत्र्य सैनिक स्व. प्रभुदयाल विद्यार्थी यांना खुद्द महात्मा गांधीजींनी एक सायकल भेट दिलेली होती. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची जाज्वल्य आठवण व संदर्भ म्हणून जळगाव येथील गांधीतीर्थ बघणाऱ्या अभ्यागतांसाठी ही सायकल खूप मोलाची ठरेल यात शंका नाही.
स्वातंत्र्य सेनानी प्रभुदयालजी यांच्या पत्नी तथा माजी आमदार श्रीमती कमला साहनी आणि त्यांची मुलगी अमिया रूंगठा यांनी ही सायकल महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांच्या सांगण्यावरून सायकल गांधी रिसर्च फाऊंडेशनचे प्रतिनिधी श्री. सुभाष साळुंखे यांच्याकडे दिली व आज सकाळी ती सायकल जळगाव येथे आणली गेली. महात्मा गांधीजींच्या परिस स्पर्शाने आठवणींचे सोने झालेली ही सायकल गांधी तीर्थमध्ये लवकरच संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत.
असा आहे सायकलीचा इतिहास…
स्वातंत्र्य संग्रामात महात्मा गांधीजींच्या वक्तृत्वाने अबालवृद्ध भारावले जात. त्यातील जोगिया उदयपूर निवासी स्वातंत्र्यता सेनानी स्व. प्रभूदयाल विद्यार्थी यांची स्वातंत्र्य आंदोलनात खूप मोलाची भूमिका होती. 1935 मध्ये ते केवळ 10 वर्षांचे असताना महात्मा गांधीजींचे शिष्य ठक्करबाप्पा यांच्यासोबत ते गांधीजींना सेवाग्राम येथे प्रथम भेटले. त्यावेळी महात्मा गांधींनी कस्तुरबा यांना प्रभुदयाल यांचा परिचय देताना म्हणाले होते की, हा तुझा सहावा मुलगा आहे. पुढील 14 वर्षे त्यांनी सेवाग्राम आश्रमात राहून महात्मा गांधींच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यामधे सहभाग घेतला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रभूदयालजी यांना आपल्या गावी जावून जनसेवा करण्यासाठी गांधीजींनी प्रोत्साहीत केले. या कार्यात त्यांना सोयीस्कर व्हावे यासाठी त्यांनी जी सायकल भेट दिली, ती हीच सायकल आहे. महात्मा गांधींकडून भेट म्हणून मिळालेली ही सायकल सुरुवातीला सेवाग्राममधे वापरली गेली. नंतर ही सेवाग्रामहून प्रभुदयालजी विद्यार्थींसोबत त्यांच्या उत्तरप्रदेशातील जोगिया गावी आली. तेथे स्वातंत्र्यानंतर जमिन कमाल मर्यादा कायद्यांतर्गत शेतकऱ्यांना जमिन वितरण आणि तत्सम इतर सामाजिक व रचनात्मक कार्यासाठी हीचा त्यांनी वापर केला. त्यांच्या याच कार्यामुळे ते ‘पूर्वांचलचे गांधी’ म्हणून ओळखले जायचे. याच सायकलवर फिरून त्यांनी 5 वेळा तेथे आमदारही झाले. महात्मा गांधी आणि प्रभुदयाल विद्यार्थी यांची हीच विरासत असलेली सायकल स्वरुपात गांधी तीर्थ येथील संग्राहलयात संरक्षित करण्यात येणार आहे.
सायकल म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा स्मृतिसुगंध- अशोक जैन
महात्मा गांधीजींच्या स्मृतिंचा सुगंध असलेल्या या सायकलीचे गांधीतीर्थ येथील अस्तित्व सुयोग्य असेच ठरणार आहे. महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी या सायकलीबाबत सांगितले असता या सायकलीबाबत उत्कंठा लागलेली होती. स्वातंत्र्य सैनिक प्रभुदयालजी यांच्या परिवाराने ही सायकल गांधीतीर्थला सुपुर्द केली याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया गांधीतीर्थचे विश्वस्त अशोक जैन यांनी दिली.
महात्मा गांधीजींकडून मिळालेल्या सायकल सुभाष साळुंखे यांना देतांना कमला सहानी व त्यांची कन्या अमिया रुंगठा तर दुसऱ्या छायाचित्रात सायकलीसमवेत गांधी तीर्थचे विश्वस्त अशोक जैन तर तिसऱ्या छायाचित्रात महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, आचार्य कृपलानी यांच्या समवेत प्रभूदयाल विद्यार्थी.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम