आमदार अपात्रता प्रकरण : ३१ डिसेंबरपर्यंत सगळी कारवाई पूर्ण करा
बातमीदार | ३० ऑक्टोबर २०२३
राज्यातील शिवसेनेत सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर गेल्या काही महिन्यापासून कोर्टात वाद सुरु असतांना आता शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून तसेच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या आमदार अपात्रता याचिकांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सोमवारी एकत्रितपणे सुनावणी घेण्यात आली. अपात्रतेच्या याचिका निकाली काढण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून टाळाटाळ होत असल्याचा आक्षेप दोन्ही याचिकांद्वारे सर्वोच्च न्यायालयाकडे घेण्यात आला आहे.
यादरम्यान आज झालेल्या सुनावणीत शिवसेना आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर ३१ डिसेंबरपर्यंत सगळी कारवाई पूर्ण करा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली कागदपत्रे विधानसभा अध्यक्षांसमोर दाखल करावीत आणि दोन दिवसांत अध्यक्षांनी त्या कागदपत्रांचा निवाडा करावा आणि पुढे जावं अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत.
यावेळी आम्ही मे मध्ये निकाल दिला मग एवढा वेळ का? असा सवाल देखील कोर्टाने विचारला. विधानसभा अध्यक्षांना आम्ही अनेक संधी दिल्या आहेत. आज प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. पुढच्या निवडणुका पर्यंत आम्ही हा गोंधळ सुरू ठेवू शकत नाही असेही कोर्टाने यावेळी म्हटले आहे. आता आम्ही वेळापत्रक ठरवलं आहे, ३१ डिसेंबरच्या अगोदर सुनावणी पूर्ण करा असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सांगितलं.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम