शिंदे गटाच्या आमदाराने सांगितला बाळासाहेबांचा ‘तो’ किस्सा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ जानेवारी २०२३ । राज्यातील शिंदे व ठाकरे गट इतक्या मोठ्या प्रमाणात एकमेकांचा विरोध करीत आहे व आज स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित मुख्यमंत्री शिंदे व उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांची एक आठवण सांगितली आहे.

8 डिसेंबर 1982 मध्ये औरंगाबाद महानगरपालिकेची स्थापना झाली. सुरुवातीची पाच वर्ष महापालिकेचा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून सुरू होता. त्यानंतर 17 एप्रिल 1988 मध्ये 60 जागांसाठी पहिली निवडणूक झाली. त्यांनतर आलेल्या निकालावेळी पक्ष स्थापन झाल्यानंतर तिसऱ्याच वर्षी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शिवसेनेने 28 जागांवर भगवा फडकवला. 1988 च्या महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या एक किस्सा संजय शिरसाट यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितला. जाणून घेऊया नेमके काय आहे किस्सा..

दिवंगत शिवसेनाप्रमुख आणि हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांसाठी नेहमीच मदत करण्याच्या भूमिकेत असायचे. आपले कार्यकर्ते कधी नाराज होणार नाहीत याची काळजी घ्यायचे. याच संदर्भात शिवसेना तळागाळापर्यंत आणि संपूर्ण महाराष्ट्रात वाढवण्यासाठी बाळासाहेबांनी काय-काय प्रयत्न केले? हे दिव्य मराठीशी बोलताना शिंदे गटाचे विद्यमान संजय शिरसाट काय म्हणालेत तुम्हीच ऐका… 1988 च्या काळात औरंगाबाद महानगरपालिकेची शिवसेनेची पहिली निवडणूक होती. शिवसेनेची पहिली टर्म असल्याने हर्सूल भागात केशवराव औताडे यांच्या वार्डमधून उमेदवार मिळत नव्हता, त्यावेळी अखेर संजय शिरसाट यांनी शिवसेना प्रमुखांच्या आदेशाने या वार्डातून निवडणूक लढवली. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना किती आणि कसा वेळ देत याबाबतचा एक किस्सा पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांनी सांगितला आहे.

औरंगाबाद मनपाची सर्वात पहिली निवडणूक असल्याने शिवसेनेचे औरंगाबादमध्ये मोजके पदाधिकारी आणि कार्यकर्ते दिसून येत होते. मात्र त्यावेळी औरंगाबादचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांच्याविरोधात हर्सूल निवडणूक लढविण्यासाठी शिवसेनेला उमेदवारच मिळत नव्हता. तेव्हा संजय शिरसाट यांनी हर्सूल वार्डतून उमेदवारी अर्ज दाखल करत दादा कोंडके यांची वार्डात सभा होईल असे सांगून टाकले होते. चिकलढाणापासून शहरात अनेक ठिकाणी दादा कोंडके यांनी अनेक कॉर्नर सभा घेतल्या.

आमदार संजय शिरसाट म्हणाले की, कॉर्नर सभाच्या ओघात हर्सूलला सभा घ्यायची आहे, हे विसरत दादा कोंडके त्याच्या हॉटेल रुममध्ये निघून आले. त्यावेळी संपर्क प्रमुख असणाऱ्या मधूकर सरपोतदार यांना संजय शिरसाट यांनी माझ्या वार्डात दादा कोडकेंची सभा ऐकण्यासाठी लोक जमले आहेत, तिथे सभा घेतली नाही तर मला प्रचार करता येणार नाही असे सांगितले. त्यावेळी सरपोतदार म्हणाले की, तुम्ही बाळासाहेबांच्या कानावर ही गोष्ट घाला, माझ्या दादांचे वय आणि कामत पाहता त्यांना मी बोलू शकणार नाही, असे म्हणत सरपोतदार आणि संजय शिरसाट हे रात्री दीड वाजेच्या सुमारास बाळासाहेबांकडे गेले आणि त्यांना सर्व प्रकार सांगितला. त्यावेळी संजय शिरसाट यांनी बाळासाहेब ठाकरेंना मी पहिल्यांदा माझा परिसर सोडून निवडणूक लढवतो आहे, मला ऐवढी मदत हवी आहे असे सांगितले. तेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणाले की जा दादा कोडकेंना बोलावून आणा म्हणत दादा कोंडके येताच दादा संजयच्या वार्डात प्रचार सभा घेणे गरजेचे आहे, तुम्हाला जायला जमेल का असे म्हणत विचारले, तेव्हा दादा कोंडके यांनी बाळासाहेबांना सांगितले तुम्ही आदेश दिले तर मी कुठेही जायला तयार आहे. रात्री दीड वाजता हॉटेलमधून आम्ही दादा कोडकेंना घेऊन रात्री दीड वाजता हर्सूलला निघालो आणि रात्री 2 वाजता जाहीर सभा घेतली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम