मुंबई : मनी लाँड्रिंगप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी तपासादरम्यान दोनवेळा आपला जबाब बदलला असल्याचा युक्तिवाद मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) करण्यात आला.
‘ईडी’ने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली़ दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे ‘ईडी’ला तपासात आढळले. त्यानुसार ‘ईडी’ने कारवाई करत मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. याआधीही मलिक यांनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. प्रत्येकवेळा मलिक यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर मलिक यांनी नव्याने अर्ज दाखल केला असून जवळपास पाच महिने उलटूनही तपास यंत्रणेनेकडून सबळ पुरावे दाखल करण्यात आले नसल्याचा दावा मलिक यांनी याचिकेतून केला आहे. सदर याचिकेवर न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी पार पडली.
नवाब मलिक यांनी तपासादरम्यान दोनवेळा आपला जबाब बदलला आहे, अशी माहिती ईडीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी युक्तिवाद करताना दिली. तसेच गोवाला कंपाऊंड ही जमीन कोणतिही शहानिशा न करता मलिक यांनी मुनीरा प्लंबर यांच्याकडून खरेदी केली असल्याचा दावाही ईडीकडून करण्यात आला. तसेच पॉवर ऑफ अँटर्नीवर असलेली स्वाक्षरी ही मुनीराची असल्याचे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. दुसरीकडे, मुनीरा यांनी सही केल्याच्या आरोपांचे खंडन केले आहे. आपण कोणतीही सही केली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे जमिन खरेदी करताना कोणतिही अतिरिक्त माहिती न घेता मलिक यांनी जमिनीचा व्यवहार कसा केला असा सवालही एएसजी सिंग यांनी उपस्थित केला. त्यांची बाजू ऐकून घेत न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी १४ सप्टेंबर रोजी निश्चित केली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम