खा. उन्मेश पाटील यांनी कृषी सचिव यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी
केळी पिकाचे चालू वर्षी जळगाव जिल्ह्यात झालेले नुकसान पाहता पिक विमा कंपनी कडून वेळेवर नुकसान भरपाई मिळवून देण्याची केली मागणी
दै. बातमीदार । ०२ ऑगस्ट २०२२ । जळगाव येथील पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन २०२१-२२ मध्ये जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी पिकविमा काढलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार लाभार्थी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम विमा कालावधी संपुष्टात आल्यानंतर ३ आठवड्यात नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणे क्रमप्राप्त आहे.
या वर्षी जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी वाऱ्यासह झालेल्या बेमोसमी पावसामुळे तसेच कमी व अधिकच्या तापमानामुळे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. सदरील नुकसान झाल्याने केळी उत्पादक शेतकरी हाताश झालेला असून निदान त्यांनी उतरविलेल्या केळी या पिकाचा विमा वेळेवर मिळावा.
अशी अपेक्षा व्यक्त केली असून शेतकऱ्यांना तात्काळ केळी पिक विमा नुकसान भरपाई अदा करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
अशी मागणी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी कृषी सचिव यांच्याकडे केली आहे. याबाबत दिलेल्या पत्रात खासदार उन्मेशदादा पाटील यांनी केळी पिक विम्याचा कालावधी दिनाक ३१ जुलै २०२२ रोजी पूर्ण होणार असुन तात्काळ पुढील ३ आठवड्याच्या आत केळी पिक विमा धारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा करण्याबाबत पिक विमा कंपनी ( भारतीय कृषी विमा कंपनी लि.) यांना सूचना देण्याची आग्रही मागणी केली आहे.
तसेच आपल्या निवेदनात महाराष्ट्र शासनाच्या १८ जून २०२१ च्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार तात्काळ कारवाई होऊन पात्र विमाधारक शेतकऱ्यांचे क्लेम सेटल करून पात्र विमाधारक शेतकऱ्यांना विमा रक्कम देण्याबाबतची मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम