राष्ट्रीयस्तर डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत अरजित मोरे ला सुवर्ण पदक

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ११ एप्रिल २०२४ | राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत अरजित मोरे याने यावर्षीचे सुवर्ण पदक मिळविले आहे. अरजित हा स्वामी विवेकानंद इंग्लिश हायस्कुल, चेंबूर, मुंबईचा विद्यार्थी असून वाशीमचे मूळ रहिवाशी अभियंता अमोल मोरे व कवियत्री, लेखिका राणी मोरे (उलेमाले) यांचा चिरंजीव आहे. डॉ होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा ही लेखी, प्रात्यक्षिक, कृती संशोधन प्रकल्प आणि मुलाखत या चार टप्प्यात घेतली जाणारी देशातील एकमेव परीक्षा असून इयत्ता ६ वी व ९ वी तील विद्यार्थ्यांसाठी असते. ग्रेटरबॉम्बे सायन्स टीचर असोसिएशन १९८१ पासून राष्ट्रीय पातळीवर आयोजित करीत आहे. यावर्षी देशभरातील ८३,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला होता त्यापैकी फक्त ३३ मुलांना सुवर्ण पदक पटकविता आले.

या स्पर्धेदरम्यान अरजित ने केलेला कृती संशोधन प्रकल्प संत्र्याच्या सालीपासून बायो-प्लास्टिकची निर्मिती करून पर्यावरणपूरक केसांचे उपकरणे बनविने खास चर्चेत राहिला. ज्यामध्ये त्याने वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मुंगळा या संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ऑरेंज व्हिलेज बाबत नमूद करून, संत्रा प्रक्रिया उद्योगाचे पर्यायाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी घरच्या घरी बायोप्लास्टिक निर्मितीचा उपाय सुचविलेला आहे. याव्यतिरिक्त त्याने ‘सखी पर्यावरणाची’ आणि ‘मित्र गरजूंचा’ या दोन महत्वकांक्षी संकल्पना देखील राबविल्या आहेत.

अरजित हा लहानपणा पासूनच वैज्ञानिक दृष्टिकोनाने प्रेरित आहे. वर्ष २०१९ मध्ये त्याने ६ वर्षाचा असतांना अंधारात प्रकाश देणाऱ्या छत्रीची निर्मिती केली होती ज्याची दखल सर्वच स्तरावर घेण्यात आली होती. यापुढे त्याने एटोमॅटिक शू शाईनर, पीवीसी पाईप चा उपयोग करुन अत्याधुनिक टेलिस्कोप, रस्त्यावरील विक्रेत्यांचे जीवनमान उजळणारी ‘इल्यूमब्रेला’ छत्री विकसित केली होती ज्यास मुंबई विज्ञान प्रदर्शनात प्रथम पारितोषिक देखील मिळाले होते. इतकेच नव्हेतर आकाशवाणी मुंबईवरील छोटा शास्त्रज्ञ कार्यक्रमात देखील सहभागी होता.

 

विज्ञानाविषयी लहान मुलांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी त्याचे स्वतःचे ‘लिटलॅंटिस्ट’ यूट्यूब चॅनल असून त्यामधून त्याची वैज्ञानिकता दिसून येते. आपल्या या यशाबद्दल बोलताना अरजित म्हणतो त्याला भौतिकशस्त्रात संशोधनात्मक कार्य करायचे असून सह्याद्रीच्या पायथ्याशी सार्वत्रिक विज्ञान संशोधन केंद्र स्थापन करायचे आहे. ज्यामुळे भारतातून जागतिक विज्ञान क्षेत्रास एक नवी दिशा एक नवी उमेद मिळेल. अरजित ने केलेली कामगिरी नक्कीच वाशीम जिल्ह्यातील विद्यार्थांना वैज्ञानिक दृष्ट्या प्रेरित करण्यास कारणीभूत ठरू शकते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम