भाजपच्या तिसऱ्या प्रयत्नाने राष्ट्रवादीत फुट ; सुप्रिया सुळे !
बातमीदार | २४ ऑगस्ट २०२३ | राज्यातील भाजप पक्षाने तीन वेळा राष्ट्रवादी पक्ष फोडण्यासाठी प्रयत्न केला असून हा काही त्यांचा पहिला प्रयत्न नव्हे असा गोप्यस्फोट राष्ट्रवादीच्या खा.सुप्रिया सुळे यांनी केला आहे. राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपने यापूर्वीही दोनदा प्रयोग केला आहे. मात्र, आधी दोन वेळेस त्यांना यश आले नाही. पण, तिसऱ्या वेळी त्यांनी तगडी रणनिती आखली आणि अजित पवार त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाले. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीतील बंड, अजित पवार यांनी सत्तेत जाण्याचे कारण, पक्षाचे भवितव्य, कायदेशीर लढाई आणि पवार कुटुंबाविषयी महत्त्वाची मते व्यक्त केली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवार यांचा निर्णय निराशाजनक आहेच. पण, संवाद साधणे हा परत येण्याचा मार्ग असू शकत नाही आणि ते परत येतील का? यावर मला प्रतिक्रिया द्यायची नाही. पण मला विश्वास आहे की, आमच्या बाजूने आम्ही कुटुंब एकत्र ठेवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. राजकारण घरात न आणण्याचा प्रयत्न आम्ही करू. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला दिलेल्या अधिकारानुसार त्यांनी स्वतःचा निर्णय घेतला. त्यामुळे राजकीय लढाई आम्ही आमच्या नात्यात का आणावी? ही तर वैचारिक लढाई आहे. आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आहोतच; पण आमच्यात वैचारिक लढाई सुरूच राहील. शरद पवार आणि अजित पवारांच्या पुण्यातील गुप्त भेटीमुळे राज्यात चांगलाच गदारोळ उडाला. मविआतील शिवसेना, काँग्रेस या घटकपक्षांनीही या गुप्त भेटीवर जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, लोकशाहीमध्ये कुणीही कुणाला भेटणे कसे काय टाळू शकतो? हे खरे आहे की, आम्ही आघाडीतील मित्रपक्षांना उत्तरदायी आणि जबाबदार आहोत. त्यामुळे त्यांना अस्वस्थता वाटत असेल, तर त्यात गैर काही नाही. ही आमची जबाबदारी आहे की, या भेटीमागील सत्य त्यांच्यापर्यंत पोहोचवले पाहिजे; जे आम्ही नक्कीच करू.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम