राष्ट्रवादीची राज्यात देखील फिरणार ‘भाकरी’ !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ जून २०२३ ।  राष्ट्रवादीचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादी पक्षातील अनेक नेते कामाला लागले असून आता राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रीय कार्यकारिणीत बदल केल्यानंतर आता राज्यातही ‘भाकरी’ फिरविण्याची तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदातून मुक्त होत पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर पक्षांतर्गत घडामोडींना वेग येत असल्याचे संकेत आहेत.

पक्षात सामाजिक समीकरण साधताना प्रमुख पदावर ‘मराठा-ओबीसी’ असे सूत्र साधण्याचा प्रयत्न पक्षातर्फे केला जाणार आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्षपदावर अजित पवार यांना संधी मिळण्याचे दाट संकेत असून, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यभरात संघटन मजबूत करण्याची रणनीती असेल. अजित पवार यांना प्रदेशाध्यक्षपद मिळाले तर विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद ओबीसी समाजातील नेत्याकडे दिले जाईल, हे स्पष्ट आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी ओबीसी नेत्यांमधून धनंजय मुंडे यांना संधी मिळण्याची शक्यता अधिक असली, तरी नवा आणि आक्रमक चेहरा म्हणून जितेंद्र आव्हाड यांचेही नाव चर्चेत आहे. यावर आता पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

राज्यात महाविकास आघाडीची वज्रमूठ अबाधित असताना राष्ट्रवादीने राज्यात नंबर एकचा पक्ष होण्याचा निर्धार केला आहे. यासाठी अजित पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा द्यावी, असे कार्यकर्त्यांसह अनेक आमदारांचे मत आहे. त्यातच आजपर्यंत पक्षसंघटनेत कोणतेही पद अजित पवार यांनी भूषविलेले नाही. त्यामुळे जर त्यांना पक्षसंघटनेत पद द्यायचेच ठरले तर ते प्रदेशाध्यक्ष हेच असेल, असे मानले जाते. दरम्यान, १८ जुलैपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच हे बदल होतील, अशी चिन्हे आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम