ट्रकभर पुरावे हवे का ? मनोज पाटलांचा सरकारवर हल्लाबोल !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १४ ऑक्टोबर २०२३ 
राज्यातील जालना जिल्ह्यातील आंतरवालीत आज लाखोंच्या संख्येने मराठा समाज एकत्र आलेला आहे. यावेळी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा प्रमुख चेहरा म्हणून पुढे आलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाच्या मुद्यावर जालन्याच्या आंतरवाली सराटीत आज भव्य सभा आहे. या सभेपूर्वी शनिवारी सकाळी त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यात त्यांनी सरकारला आरक्षणाशिवाय मागे न हटण्याचा स्पष्ट इशारा दिला. ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण हवे आहे. यासाठी सरकारच्या हातात 10 दिवस आहेत. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आज आंतरवालीत जमलेली गर्दी मराठा समाजासाठी सुवर्णक्षण आहे. या सभेसाठी सर्वच मराठा बांधव एकवटलेत हे पाहून समाधान वाटत आहे.
पुढील 10 आम्ही आरक्षण घेणारच, असा इशार देत या प्रकरणी मनोज जरांगे यांनी सरकारला आरक्षण देण्यासाठी 5 हजार पुरावे पुरेसे नाही, आता तुम्हाला ट्रकभर पुरावे हवे आहेत का? असा प्रश्नही विचारला. शिंदे समिती सध्या मराठवाड्यात फिरत आहे. सरकारच्या मते, आरक्षण देण्यासाठी 5 हजार पुरावे पुरेसे नाहीत. माझा त्यांना प्रश्न आहे, तुम्हाला ट्रकभर पुरावे हवे आहेत का? एक पुरावा सापडला तरीही पुरावा असतो. आयोग किंवा समिती स्थापन केली, तर ती 5 हजार पानांचा अहवाल देते का? असेही मनोज जरांगे यावेळी म्हणाले.

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, मराठा समाजाची भावना सरकारला समजत नसेल तर ती त्यांची समस्या आहे. आमचे आंदोलन शांततेत होईल. त्यात कोणताही बदल होणार नाही. पण सरकारला आरक्षण द्यावेच लागेल. पुढील 10 दिवसांत आम्हाला आरक्षण मिळाले नाही तरी आमच्याकडून शांततेचा भंग होणार नाही. सरकारने आरक्षण दिले नाही तर आम्ही आंदोलनाची पुढील दिशा ठरवू, असे ते म्हणाले. मी आज मराठा समाजापुढे आरक्षणासंबंधीची वस्तुस्थिती मांडणार आहे. मराठा समाज आज शांत आहे. मायबाप मराठा समाजावर माझा विश्वास आहे. शांततेत आंदोलन केल्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आम्ही काहीही झाले तरी आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम