अजित पवारांच्या हाती काहीच नाही ; संजय राऊत !
बातमीदार | २७ सप्टेंबर २०२३ | नाशिकमध्ये गेल्या आठ दिवसांपासून कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवले आहेत. यासंदर्भात काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत व्यापाऱ्यांसोबत बैठक घेतली. पंरतू, या बैठकीत कोणताही तोडगा निघत नसल्याने ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, अजित पवार कांद्याचा प्रश्न सोडवू शकणार नाहीत. शेतकरी प्रश्नावर किंवा अन्य कुठल्याही मुद्द्यावर अजित पवार निष्कर्ष काढू शकत नाहीत. कारण त्यांच्या हातात काहीच नाही. संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रातला कांद्याचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्री पियूष गोयल नाशिकच्या व्यापाऱ्यांना आणि राज्यातील मंत्र्यांना दिल्लीत बोलवत आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री स्वतः इकडे आले होते ना? तेव्हा त्यांनी काय केले? राज्याचे कृषीमंत्री, वित्तमंत्री, मुख्यमंत्री या सगळ्यांनी आतापर्यंत काय केले? ते गोयल स्वतःला मुंबईचे म्हणवतात, परंतु, आता ते अहमदाबादला जाऊन बसले आहेत. मुळात तुम्ही इथल्या शेतकऱ्यांसाठी काय केलेत ते सांगा.
परदेशात जाण्यापेक्षा दुसऱ्या राज्यात गेलेले उद्योग परत आणा, असा टोलाही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. संजय राऊत म्हणाले, आदित्य ठाकरेंच्या ट्वीटमुळेच मुख्यमंत्र्यांचा परदेश दौरा रद्द झालेला आहे. दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील दुष्काळपरिसस्थितीमुळे मुख्यमंत्र्यांनी दौरा रद्द केला, असे स्पष्टीकरण दिले आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, राज्यात दुष्काळ आहे हे आधी नव्हते कळले का? राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक घाईने परदेश दौऱ्यावर निघाले होते. पण मुख्यमंत्री हे कोणत्या देशात जाणार होते. ते फार गुप्त ठेवण्यात आले होते. कोण म्हणते की, ते जर्मनीला चालले होते. कोण म्हणते की, ते यूकेला चालले होते. घर बांधणी, जहाज उद्योग, अशा अनेक प्रकल्पांना मुख्यमंत्री भेटी देणार होते आणि महाराष्ट्रात गुंतवणूक आणणार होते. आम्ही आपले आभारी आहोत. गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रातून जी गुंतवणूक आपल्या कारर्कीदीत बाजूच्या राज्यात गेली. ती आधी घेऊन या. अनेक राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावरील मुख्यालय गुजरात पळून घेऊन गेलेत. ती आधी घेऊन या. मुंबईला पुन्हा ते वैभव मिळवून द्या. तुम्ही तिकडे जाण्याने काय होणार आहे. सरकारी पैशाचा अपव्यय.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम