आता ॲम्ब्युलन्सच्या सायरनमधून येणार बाळाचा गोड आवाज !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ मे २०२३ ।  सध्या अनेक भागात बाळंतीण महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेतून ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात येत असते. त्यासोबतच नेहमी आपल्याला ॲम्ब्युलन्सच्या सायरनचा धडकी भरवणारा आवाज, ॲम्ब्युुलन्समधील तणावाचे वातावरण याऐवजी बाळाच्या गोड आवाजाचा सायरन, आत रंगीबेरंगी चित्रे, मंद संगीताची सोबत असे आल्हाददायक वातावरण असेल तर? बाळंतीण आणि बाळालाही असा आनंद देणाऱ्या ‘खिलखिलाहट ॲम्ब्युलन्स’ मुंबईच्या रस्त्यावर लवकरच दिसतील. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना गुजरातेत ‘खिलखिलाहट ॲम्ब्युलन्स’ सेवा सुरू झाली हाेती. ही सेवा आता आधी मुंबईत सुरू हाेईल व नंतर राज्यभर विस्तार करण्यात येईल.

या कामीही होणार उपयोग…
महिलेला बाळंतपणासाठी वा गरोदरपणाच्या काळात काही त्रास झाला तर इस्पितळात पोहोचविण्यासाठी. बाळ आजारी असल्यास इस्पितळात नेण्यासाठी.
बाळ-बाळंतिणीला आनंददायी वातावरणात घरी पोहोचविण्यासाठी पहिल्या टप्प्यात पाच ॲम्ब्युलन्स रुजू होतील. ही सेवा विनामूल्य असेल. जून अखेरीस ही सेवा मुंबईत सुरू करण्याचे बैठकीत ठरले. मुंबईनंतर राज्याच्या अन्य भागातही ही सेवा सुरू करण्याचा मानस आहे. यावेळी महिला, बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बोलून दाखविला आहे.

काय असेल ॲम्ब्युलन्सच्या आत…
एरवी रस्त्यावरून जाणाऱ्या ॲम्ब्युलन्सचा सायरन अनेकांच्या हृदयात धडकी भरवतो. गरोदर महिलेवर वा नवजात शिशूवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून या ॲम्ब्युलन्सचा आवाज हा लहान मुलाच्या हसण्याचा असेल. आतमध्ये छान छान चित्रे असतील अन् खेळणीही.
ॲम्ब्युलन्सच्या दर्शनी भागावरही रंगीबेरंगी चित्रे असतील. आत नवजात शिशूंना टप्प्याटप्प्याने देण्यात येणाऱ्या लसींबाबतची माहिती लावलेली असेल. तसेच जवळपासच्या इस्पितळांची माहितीही दिलेली असेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम